काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्यावतीने (NSUI) मंगळवारी दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात तक्रार अर्ज देण्यात आला. राफेल करारातील कागदपत्रांची चोरी झाल्याप्रकरणी हा तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

राफेल कराराशी संबंधित कागदपत्रांची चोरी झाल्याचा दावा अ‍ॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी नुकताच सर्वोच्च न्यायालयात केला होता. ‘हिंदू’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध होत असलेल्या बातम्या या त्याच कागदपत्रांवर आधारित असून हा गोपनीयता कायद्याचा भंग आहे, असाही पवित्रा त्यांनी सरकारची बाजू मांडताना घेतला होता. त्यावर सातत्याने सुरू झालेल्या टीका आणि टोलेबाजीनंतर तब्बल दोन दिवसांनी ‘मी तसे बोललोच नाही, माझ्या बोलण्याचा तसा अर्थच नव्हता,’ असा पवित्रा घेण्याची वेळ देशाच्या अ‍ॅटर्नी जनरल यांच्यावर आली होती.

या पार्श्वभूमीवर काँग्रेसप्रणीत विद्यार्थी संघटना नॅशनल स्टुडन्ट युनियन ऑफ इंडियाच्या वतीने दिल्लीतील संसद मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला आहे. ‘संरक्षण विभागातील गोपनीय कागदपत्रे चोरीला जाणे धोकादायक असून याद्वारे मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करता येऊ शकते. यामुळे सुप्रीम कोर्ट आणि सर्वसामान्य जनतेची दिशाभूल करणे शक्य आहे’, असे या तक्रार अर्जात म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिलायन्स डिफेन्सच्या नफ्यासाठी ‘एचएएल’ला डावलले आणि यासाठी मोदींनी पंतप्रधान कार्यालयामार्फत समांतर चर्चा केली, असा आरोप यात करण्यात आला आहे. राफेल करारामुळे देशाचे आर्थिक नुकसान झाले असून मोदींनी फक्त मित्रांचा फायदा करुन दिला नाही. त्यांनी देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण केला, असा आरोप यात करण्यात आला आहे. संसद मार्ग पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी तक्रार अर्ज प्राप्त झाल्याचे मान्य केले.