राफेल करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुरुवारी गंभीर आरोप केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मित्रांना मदत करण्यासाठीच राफेल करार केला असून मोदी आणि अनिल अंबानी यांच्यात काय डील झाली हे देशाला जाणून घ्यायचे आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेत नोटाबंदी आणि राफेल करारावरुन भाजपा सरकारवर टीकेची झोड उठवली. नोटाबंदी ही मोदी सरकारची चूक नव्हती. तर सर्वसामान्यांच्या पायावर सरकारने कुऱ्हाड मारली. हा निर्णय जाणूनबुजून घेण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. आता पुरावे समोर येत आहेत. नोटाबंदी हा महाघोटाळाच होता, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

राफेल करारावर राहुल गांधी म्हणाले, अनिल अंबानींनी कधीच विमानाची निर्मिती केलेली नाही. अनिल अंबानींवर ४५ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. राफेल कराराच्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी कंपनी स्थापन केली. तर दुसरीकडे एचएएलसारख्या कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. ७० वर्षांपासून विमानिर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ५२० कोटी रुपयांचे विमान मोदी सरकारने १६०० कोटी रुपयांमध्ये का विकत घेतले, असा सवाल त्यांनी विचारला. मोदी आणि अनिल अंबानींमध्ये काय डिल झाली, राफेल करारासाठी संयुक्त संसदीय समिती का नेमली जात नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.

राफेल करारावरुन निराधार आरोप केले जात असल्याचे सांगत अनिल अंबानींनी काँग्रेस नेत्यांविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला आहे. यावरही राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली. अनिल अंबानींनी अब्रूनुकसानीचे कितीही खटले दाखल केले तरी यामुळे सत्य बदलू शकत नाही, असे त्यांनी सांगितले. मोदी सरकारच्या राफेल करारातील विमानाचे दर तीन पट जास्त आहेत, असे त्यांनी नमूद केले.

संयुक्त संसदीय समिती नेमून या कराराची चौकशी करावी, हीच माझी मागणी आहे. यावर आमचा किंवा अन्य कोणत्याही विरोधी पक्षाचा आक्षेप नाही. अरुण जेटली मोठे ब्लॉग लिहीतात. पण ते संयुक्त संसदीय समितीवर काहीच बोलत नाही, अशी टीका त्यांनी केली.