माझ्या म्हणण्याचा विपर्यास : अ‍ॅटर्नी जनरल यांची सारवासारव

नवी दिल्ली : राफेल कराराशी संबंधित कागदपत्रांची चोरी झाल्याचा दावा अ‍ॅटर्नी जनरल के के वेणुगोपाल यांनी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात केला आणि त्यावर सातत्याने सुरू झालेल्या टीका आणि टोलेबाजीनंतर तब्बल दोन दिवसांनी ‘मी तसे बोललोच नाही, माझ्या बोलण्याचा तसा अर्थच नव्हता,’ असा पवित्रा घेण्याची वेळ देशाच्या  या अ‍ॅटर्नी जनरल यांच्यावर आली आहे.

संरक्षण मंत्रालयासारख्या अत्यंत संवेदनाक्षम खात्यातील अत्यंत महत्त्वाची अशी कागदपत्रे चोरीला जातात, या मुद्दय़ावरून विरोधकांनी सरकारच्या ‘चौकीदारी’वर टीका सुरू केली होती. गुरुवारच्या सर्व वृत्तपत्रांत चोरीची बातमीही प्रसिद्ध झाली. वृत्तवाहिन्यांवर तर बुधवारपासूनच या चोरीवरून उलटसुलट चर्चेला तोंड फुटले होते. त्यामुळे आपण जे बोललो नाही, त्याची बातमी होत असताना दोन दिवस अ‍ॅटर्नी जनरल आणि सरकारने मौन का बाळगले, असा प्रश्नही निर्माण झाला आहे.

वेणुगोपाल यांनी ‘प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘‘ती कागदपत्रे चोरीला गेल्याचे मला म्हणायचेच नव्हते. तर गोपनीय कागदपत्रांची चोरून झेरॉक्स काढली गेली आहे, असा माझ्या म्हणण्याचा अर्थ होता.’’

अ‍ॅटर्नी जनरल यांनी दोन दिवस विलंबाने घेतलेल्या या बचावात्मक पवित्र्याने विरोधकांच्या टीकेची धार वाढण्याचीच शक्यता आहे. मंत्रालयातील सूत्रांनुसार ही कागदपत्रे चोरीला गेल्याची अ‍ॅटर्नी जनरल यांची शब्दयोजना अधिकच कठोर होती आणि ती टाळायला हवी होती.

राफेल कराराची कागदपत्रे चोरीला गेली, असा माझ्या म्हणण्याचा अर्थ विरोधकांनी काढला आहे. पण तो चुकीचा आहे. ती कागदपत्रे चोरीला गेली, असा माझ्या म्हणण्याचा अर्थ नाही, तर त्या कागदपत्रांची चोरून झेरॉक्स काढली गेली, हा माझ्या वक्तव्याचा मथितार्थ होता.

– के. के. वेणुगोपाल, अ‍ॅटर्नी जनरल.