फ्रान्सकडून विकत घेण्यात येणारी राफेल फायटर विमाने आणि एस-४०० एअर डिफेन्स मिसाइल सिस्टिम हे दोन्ही करार बूस्टर डोस ठरणार आहेत असे एअरचीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी म्हटले आहे. सध्या देशात राफेल फायटर विमानांच्या खरेदी करारावरुन मोठा गदारोळ सुरु असताना एअरचीफ मार्शल धानओ यांनी व्यक्त केलेले हे मत महत्वपूर्ण आहे.

दिल्लीत पत्रकार परिषदेला संबोधित करताना धानोआ यांनी हे विधान केले. एस-४०० मिसाइल सिस्टिम भारत रशियाकडून विकत घेणार आहे. करार झाल्यानंतर २४ महिन्यांच्या आत भारताला एस-४०० मिसाइल सिस्टिम मिळेल असे धानोआ यांनी सांगितले.

उपखंडाचा विचार करता राफेल एक उत्तम फायटर विमान आहे. राफेल कराराचे आपल्याला खूप फायदे असून हे विमान गेमचेंजर ठरेल असे धानोआ यांनी सांगितले. राफेल व्यवहारात विमानांची संख्या १२६ वरुन ३६ करण्यात आली त्याची हवाई दलाला माहिती दिली होती का ? या प्रश्नावर धानोआ म्हणाले कि, योग्य पातळीवर यासंबंधी सरकार बरोबर चर्चा झाली होती. आम्ही सरकारला काही पर्याय सुचवले होते. अखेर कुठला निर्णय घ्यायचा ते सरकारवर अवलंबून होते असे धानोआ यांनी सांगितले.

हवाई दलाची तात्काळ निकड लक्षात घेऊन राफेलच्या दोन स्कवाड्रन्स विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला असे धानोआ यांनी सांगितले. या संपूर्ण करारात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडला बाजूला ठेवण्याचा मुद्दा नाही असे त्यांनी सांगितले.