राफेल करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आक्रमक झाले असून गुरुवारी राहुल गांधी यांनी थेट नरेंद्र मोदींवरच गंभीर आरोप केले आहेत. नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचारी आहेत. नरेंद्र मोदी हे अनिल अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील ३० हजार कोटी रुपये अनिल अंबानींच्या खिशात टाकले, अशा शब्दात राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

दिल्लीत गुरुवारी राफेल करारासंदर्भात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर टीका केली. राहुल गांधी म्हणाले, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नाहीत. ते अनिल अंबानींचे पंतप्रधान आहेत. ते अंबानींचे चौकीदार असून त्यांनी सरकारी तिजोरीतील ३० हजार कोटी रुपये अनिल अंबानी यांना दिले. अनिल अंबानी यांना यापूर्वी कधीही विमान निर्मितीचा अनुभव नाही. कराराच्या १० दिवसांपूर्वी त्यांनी कंपनीची स्थापना केली. अनिल अंबानींवर हजारो कोटी रुपयांचे कर्ज असून अशा व्यक्तीच्या कंपनीला राफेल करारात स्थान देण्यात आले, याकडेही राहुल गांधी यांनी लक्ष वेधले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशीच झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

वाचा: राफेल कराराची ‘रूपेरी’ कडा उघड!

वाचा: राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना अनिल अंबानींनी दिले उत्तर

राफेल करारावरुन काँग्रेसने मोदी सरकारची कोंडी केली असून आजवर या करारावरुन टीका करताना काँग्रेसने मोदी भ्रष्टाचाऱ्यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप केला होता. मात्र, गुरुवारी राहुल गांधी यांनी थेट नरेंद्र मोदींनाच भ्रष्टाचारी ठरवले आहे. राफेल करारावरुन वादळ उठले असतानाच देशाच्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण फ्रान्समध्ये पोहोचल्या आहेत. संरक्षणमंत्र्यांना तिथे जाण्याची इतकी घाई का होती, असा सवालही राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत विचारला.