News Flash

तुमच्या राजकीय भूमिकेत आम्हाला रस नाही, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारले

प्रतिज्ञापत्रातील त्रुटींसाठी राहुल गांधी यांनी कोर्टात माफी मागितली आहे

संग्रहित छायाचित्र

‘चौकीदारच चोर आहे’, या विधानावरुन सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मंगळवारी फटकारले आहे. तुमच्या राजकीय भूमिकेत आम्हाला रस नाही, असे खडे बोल सुनावत सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांच्या माफीनाम्यावर ताशेरे ओढले आहेत.

राफेल खरेदीसंदर्भात माध्यमातून उघड झालेली कागदपत्रे ही पुरावा म्हणून विचारात घेतली जातील, असे सुप्रीम कोर्टाने फेरयाचिकेवरील सुनावणीत स्पष्ट केले होते. या आदेशाचा आधार घेत राहुल यांनी सुप्रीम कोर्टानेही आता ‘चौकीदार चोर आहे’ असे म्हटल्याचे विधान केले होते. सुप्रीम कोर्टाच्या तोंडी स्वत:ची विधाने घालणे हा न्यायालयाचा अपमान असल्याचे कारण देत भाजपाच्या खासदार मीनाक्षी लेखी यांनी राहुल यांच्याविरोधात अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर राहुल गांधी यांनी २२ एप्रिल रोजी सुप्रीम कोर्टात दिलगिरी व्यक्त केली होती. राहुल गांधी यांनी कोर्टात २२ पानी प्रतिज्ञापत्र सादर करत दिलगिरी व्यक्त केली होती.

मंगळवारी या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने प्रतिज्ञापत्रातील शब्दप्रयोगांवर नाराजी व्यक्त केली. प्रतिज्ञापत्रात राहुल गांधींच्या वतीने दिलगिरी व्यक्त करताना अनेक शब्दांचा कंसात वापर करण्यात आला होता. यावर कोर्टाने नाराजी व्यक्त केली.  राहुल गांधी यांच्या वतीने अभिषेक मनू सिंघवी यांनी बाजू मांडली. राहुल गांधी यांनी सुनावणीदरम्यान प्रतिज्ञापत्रासाठी माफी मागितली. यावर सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांच्या वकिलांना विचारले की, माफी मागण्यासाठी तुम्हाला २२ पानी प्रतिज्ञापत्राची गरज भासते का?

युक्तिवादारम्यान सिंघवी हे काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या चौकीदार चोर है या टीकेवर स्पष्टीकरण देत होते. यावर सुप्रीम कोर्टाने सिंघवी यांना रोखले आणि तुमच्या राजकीय भूमिकेत आम्हाला रस नाही. तुमची भूमिका तुमच्याकडेच राहू द्या, असे सुप्रीम कोर्टाने सुनावले. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 3:51 pm

Web Title: rafale deal rahul gandhi supreme court chowkidar chor hai political jibe apology
Next Stories
1 गदर इफेक्ट… सनी देओलला चाहत्यांनी भेट दिला हॅण्ड पंप
2 PNB Bank : पंजाब नॅशनल बँकेची ‘ही’ सेवा होणार आजपासून बंद!
3 मोदी-अमित शाह म्हणजे अहिरावण, महिरावण-रामदास फुटाणे
Just Now!
X