‘एचएएल’ला डावलल्याची माजी प्रमुखांची भावना; सीतारामन यांच्या राजीनाम्याची राहुल यांची मागणी; जेटली यांचा राहुल यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप

लढाऊ राफेल विमानांची बांधणी ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (एचएएल) करू शकत नव्हती, हा संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांचा दावा ‘एचएएल’चे निवृत्त अध्यक्ष टी. सुवर्ण राजू यांनी नाकारल्यानंतर राजकीय वर्तुळात वाक् युद्धाला पुन्हा जोर आला असून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

संरक्षणमंत्री सीतारामन या धडधडीत खोटे बोलत आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, असे गांधी म्हणाले. सीतारामन यांचा उल्लेख ‘रक्षामंत्री’ऐवजी ‘राफेल मंत्री’ असा करून गांधी यांनी ट्विपण्णी केली की, भ्रष्टाचार दडपण्याच्या धडपडीत सीतारामन यांचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. राफेल विमानांचे कंत्राट काही बडय़ा उद्योगपती मित्रांना मिळावे यासाठी एचएएलला बाजूला करून सरकारने तिजोरीवर ४१ हजार कोटी रुपयांहून अधिक बोजा टाकला आणि देशाची सुरक्षितता धोक्यात आणली, असा आरोप त्यांनी केला.

राफेल विमानांच्या खरेदी व्यवहाराबाबत पंतप्रधानांनी राखलेले ‘मौन’ आणि फरारी उद्योगपती विजय मल्या याच्यावर कारवाई करण्यात आलेले ‘अपयश’ पाहता देशाचा चौकीदारच चोर झाला आहे, असे लोक म्हणू लागले आहेत, अशी टीकाही राहुल गांधी यांनी सागवाडा येथील जाहीर सभेत केली.

राहुल यांचे आरोप केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी ‘फेसबुक’वरून फेटाळले असून ‘राजकीय विदूषक’ म्हणून त्यांची संभावना केली आहे. जेटली म्हणाले की, अन्य लोकशाही देशांत खोटारडय़ा नेत्यांना जनताच धुडकावते. परिवारवाद जपणाऱ्या काँग्रेसला ते जमणार नाही. पण राहुल यांच्या खोटारडेपणाला प्रतिसाद द्यायचा की नाही, हे जनताच त्यांना दाखवून देईल.

१५ बडय़ा उद्योगपतींचे अडीच लाख कोटी रुपयांचे कर्ज केंद्र सरकारने माफ केल्याचा आरोप राहुल यांनी केला आहे. मात्र कोणाचाही एक रुपयादेखील माफ केलेला नाही. जे १२ बडे थकबाकीदार आहेत त्यांना २०१४ पूर्वीच कर्ज दिले गेले असून सध्याचे सरकार मात्र त्याच्या वसुलीसाठी प्रयत्नशील आहे, असा दावाही जेटली यांनी केला.

‘एचएएल’च्या माजी प्रमुखांचा दावा

राफेल जेट विमानांची बांधणी ‘हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड’ (एचएएल) सहज करू शकली असती, असा दावा या संस्थेच्या अध्यक्षपदावरून अवघ्या तीन आठवडय़ांपूर्वी निवृत्त झालेले टी. सुवर्ण राजू यांनी केल्याने सरकारची अधिकच कोंडी झाली आहे. जर आम्ही २५ टन वजनाची सुखोई-३० ही अद्ययावत लढाऊ विमाने बनवू शकलो, तर राफेल का बनवू शकत नव्हतो, असा सवाल त्यांनी केला. या व्यवहाराशी संबंधित फाईल सरकारने उघड करण्यास काय प्रत्यवाय आहे, असा सवालही त्यांनी केला.