भारतात येण्यासाठी ‘राफेल’ फायटर विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून सोमवारी म्हणजेच २७ जुलै रोजी उड्डाण केले आहे. पहिल्या तुकडीत एकूण पाच विमाने आहेत. ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल फायटर विमाने आज म्हणजेच बुधवारी २९ जुलै रोजी भारतात लँडिंग करतील. ही विमाने ज्या अंबाला एअर फोर्स स्टेशनवर उतरणार आहेत ते भारतीय हवाई दलाच्या सर्वात जुन्या एअरबेसपैकी एक आहे. हाच एअरबेस राफेल विमानांचा देशातील मुख्य तळ असणार आहे. फ्रान्सच्या समुद्रकिनारी असणाऱ्या बोर्डीऑक्स शहरातील मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन उड्डाण केलेली ही विमाने जवळजवळ सात हजार किमीचा प्रवास करणार आहेत. या विमानांमध्ये एरियल री-फ्युएलिंग म्हणजेच हवेमध्येच इंधन भरण्यात आलं आहे. यासंदर्भातील काही फोटो भारतीय हवाई दलाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आले आहेत. या विमानांनी संयुक्त अरब अमिरातीमधील अल दफरा विमानतळावर एक नियोजित हॉल्ट घेतला आहे. आज ही विमाने सकाळी ११ च्या सुमारास या विमानतळावरुन उड्डाण करतील आणि दुपारी दोन पर्यंत अंबाल एअरबेसवर लॅण्डिंग करतील अशी शक्यता व्यक्त केली जात असल्याचे एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटलं आहे.

अंबाला एअरबेसचे महत्व

> अंबाला एअरबेसचा इतिहास हा १०० वर्षांहून अधिक जुना आहे. १९१९ साली रॉयल एअर फोर्सने ब्रिस्टोल फायटर्ससोबत याच एअरबेसवर ९९ स्क्वॉड्रनची स्थापना केली होती. त्यानंतर पुढील तीन वर्षांमध्ये म्हणजेच १९२२ साली अंबाला हे ब्रिटीशांच्या रॉयल एअर फोर्सचे हे भारतातील मुख्य तळ बनले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९४८ ते १९५४ या सहा वर्षांच्या कालावधीमध्ये या एअरबेसचा वापर वैमानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात आला.

नक्की पाहा >> एरियल री-फ्युएलिंग : ३० हजार फुटांवर राफेलमध्ये भरलं इंधन; पाहा थक्क करणारे फोटो

> पाकिस्तानने १९६५ आणि १९७१ च्या युद्धादरम्यान अंबाला एअरबेसवर हल्ला केला होता. मागील वर्षी तत्कालीन हवाई दल प्रमुख बी एस धनोआ यांनी १७ स्क्वॉड्रनला अंबाला एअरबेसवर पुन्हा सक्रीय केलं. भारतीय हवाईदलाचे (आयएएफ) मार्शल आणि ‘फाइव्ह स्टार रँक’ प्राप्त अधिकारी दिवंगत अर्जन सिंह यांचे सुद्धा अंबाला एअरबेसबरोबर खास नातं नाहे. अर्जन सिंह हे एकेकाळी अंबाला एअरबेसचे प्रमुख होते. ते ग्रुप कॅप्टन म्हणून येथे कार्यरत होते. एअर मार्शल सुब्रतो मुखर्जी जे भारतीय हवाई दलाचे पहिले कमांडर इन चीफ होते त्यांनीही अंबाला एअरबेसवरील स्क्वॉड्रनचे नेतृत्व केलं आहे.

> राफेल विमानं ही अंबाला एअरबेसवरील ‘गोल्डन अ‍ॅरोज’ १७ स्क्वॉड्रनचा भाग असतील. १९९९ साली झालेल्या कारगील युद्धामध्ये माजी हवाई दलप्रमुख धनोआ हे या स्वाड्रनचे नेतृत्व करत होते.  या स्क्वॉड्रनची स्थापना १९५१ साली करण्यात आली आहे. सर्वात आधी या स्कवाड्रन अंतर्गत दी हॅवलॅण्ड व्हॅम्पायर एफ एमके ५२ फायटरजेट विमानांनी उड्डाण केलं होतं.

> भटिंडा एअरबेसवरील कारभार हळूहळू बंद करण्यात आला. २०१६ साली रशियन बनावटीची मीग २१ विमानांचा वापर भारतीय हवाई दलाकडून कमी प्रमाणात करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर येथील स्कवाड्रनचेही काम थांबवण्यात आलं.

> आज २९ जुलै रोजी राफेलची पाच विमाने अंबाला एअरबेसवर उतरतील तेव्हा ते या अंबाला एअरबेसच्या इतिहासाचा एक भाग होणार आहेत. ही विमाने ऐतिहासिक अशा गोल्डन अ‍ॅरोज स्क्वॉड्रनमध्ये असतील. स्क्वॉड्रनमध्ये एखाद्या ठराविक एअरबेसवरुन एकाचवेळी कार्यन्वयित असणारी एकाहून अधिक फायटर जेट विमाने. राफेल विमानांना तातडीने हवाई दलामध्ये सहभागी करुन घेण्यासंदर्भातील सर्व तयारी भारतीय हवाई दलाने केली आहे. यामध्ये अगदी आवश्यक असणाऱ्या सोयी सुविधांपासून ते वैमानिकांना प्रशिक्षण देण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा समावेश आहे.

> अंबाला एअरबेसवर राफेलचे पहिले स्क्वॉड्रन नियुक्त करण्यात येईल. भारतीय हवाई दलाच्या सर्वात महत्वाच्या एअरबेसपैकी एक असल्याने अंबाला एअरबेसला विशेष महत्व आहे. या एअरबेसपासून अवघ्या २२० किमीवर भारत पाकिस्तानची सीमा आहे. राफेल विमानांचे दुसरे स्क्वॉड्रन पश्चिम बंगालमधील हासिमारा एअरबेसवर तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे एकाच वेळी पाकिस्तान आणि चीनच्या जवळच्या एअरबेसवर ही विमाने तैनात असणार आहेत.

राफेल सर्वोत्तम

> राफेल हे सध्याच्या घडीला तांत्रिकदृष्ट्या जगातील अत्याधुनिक विमानांपैकी एक आहे.  राफेलची स्नेक्मा एम-८८-२ टबरेफॅन इंजिने त्याला ताशी कमाल २१२५ किमी इतका वेग प्रदान करतात. त्याचा पल्ला १८५० किमी (दुहेरी ३७०० किमी) आहे. ते कमाल ६५,६२० फूट (२० किमी) उंची गाठू शकते. त्रिकोणी आकाराचे मुख्य पंख (डेल्टा विंग्ज) आणि त्यापुढील कॉकपिटजवळील लहान आकाराचे पंख (कॅनार्ड) त्याला उत्तम उड्डाण क्षमता मिळवून देतात. राफेल युद्धजन्य स्थितीत केवळ ४०० मीटर लांबीच्या धावपट्टीवरून हवेत झेपावू शकते.

> राफेलच्या निर्मितीत प्रामुख्याने कार्बन आणि केवलार कॉम्पोझिट्सचा तसेच टायटॅनियम आणि अ‍ॅल्युमिनियम-लिथियम मिश्रधातूंचा वापर केला आहे. त्यामुळे त्याची इलेक्ट्रो-मॅग्नेटिक आणि इन्फ्रा-रेड सिग्नेचर कमी होऊन त्याला स्टेल्थ क्षमता प्राप्त झाली आहे. म्हणजेच राफेल शत्रूच्या रडारवर सहजपणे न दिसता लपून हल्ले करू शकते.

> कॉकपिटमधील हॅण्ड्स ऑन थ्रॉटल अँड स्टिक (होटास), वाइड अँगल हेड-अप डिस्प्ले, फ्लाय बाय वायर प्रणाली आणि शक्तिशाली रडार यांनी त्यांचे नियंत्रण सुलभ होते. हेल्मेट माऊंटेड वेपन्स साइट प्रणाली वैमानिकाला केवळ नजर स्थिरावेल त्या लक्ष्यावर हल्ला करण्याची क्षमता देते. लढाईच्या धामधुमीत वैमानिक विमानाच्या संगणकाला तोंडी आदेश देऊन (डायरेक्ट व्हॉइस इनपुट) विमान नियंत्रित करू शकतो. त्यावर ३० मिमी व्यासाची कॅनन, पारंपरिक किंवा स्मार्ट बॉम्ब यांच्यासह मात्रा मायका, स्काल्प, मिटिऑर, एक्झोसेट ही क्षेपणास्त्रे तसेच अण्वस्त्रे असा एकूण ६००० किलो वजनाचा शस्त्रसंभार वाहून नेता येतो.

भारत-फ्रान्स संबंध

> हवाई क्षेत्रात त्यातही खास करुन फायटर विमानांच्या बद्दल भारत आणि फ्रान्सचे संबंध कायमच चांगले राहिले आहेत. भारताने १९५३ साली फ्रान्सकडून तुफानीज विमाने विकत घेतली होती. त्यानंतर मिस्ट्री, जॅग्वार आणि मिराज विमानेही भारताने फ्रान्सकडून घेतली आहेत.

> भारताने फ्रान्स सरकारबरोबर २०१६ साली सप्टेंबर महिन्यामध्ये राफेल विमान खरेदीसंदर्भात करार केला आहे. राफेल विमानांच्या खरेदीच्या या पाच वर्षांपूर्वीच्या करारानुसार भारतीय हवाई दलाला फ्रान्सची दसॉल्ट कंपनी ३६ विमाने देणार आहे. हा करार ५९ हजार कोटींचा आहे.