“पूर्व लडाख सीमेवर दादागिरी करणाऱ्या चीनला रोखण्यासाठी भारताने सैन्य बळाची पुरेशी तैनाती केली आहे. चीनच्या मनात प्रामुख्याने ‘राफेल’ फायटर जेट्सची भीती आहे. चीनच्या गोटात राफेलमुळे चिंतेचे वातावरण आहे. इंडियन एअर फोर्सच्या ताफ्यात फ्रेंच बनावटीची राफेल फायटर विमाने दाखल होताच, चीनने लगेच भारतीय सीमेजवळ J-20 फायटर जेट्सची तैनाती केली” असे एअर फोर्स प्रमुख आर.के.एस. भदौरिया गुरुवारी म्हणाले.
“सध्या दोन्ही बाजूंमध्ये चर्चा सुरु आहेत. आवश्यक असलेली सैन्य तैनाती आम्ही केली आहे. चर्चा कशी होते, त्यावर सर्व काही अवलंबून आहे. तणाव कमी झाला, सैन्य माघारीची प्रक्रिया सुरु झाली तर ती एक चांगली गोष्ट ठरेल. जर असं घडलं नाही आणि काही नवीन परिस्थिती उदभवली, तर त्यासाठी आम्ही तयारच आहोत” असे भदौरिया यांनी सांगितले.
लडाख सेक्टरमधून चीनने माघार घेतल्याच्या बातम्यांवर आर.के.एस. भदौरिया म्हणाले की, “हवाई तैनातीच्या दृष्टीने चीनने काही बदल केले आहेत. काही ठिकाणी माघार घेतलीय. पण त्याचवेळी त्यांनी हवाई सुरक्षा कवच आणखी बळकट केलंय.” प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थितीनुसार, आम्ही आमची तैनाती आणि तयारीमध्ये बदल करु असे भदौरिया म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 4, 2021 2:15 pm