हवाईदल प्रमुख बी. एस. धनोआ यांची ग्वाही

हिंदोन : राफेल लढाऊ विमाने आणि एस-४०० क्षेपणास्त्रे दाखल झाल्यानंतर हवाई दलाच्या मारकक्षमतेते मोठी वाढ होणार आहे. भारतीय हवाई दल कोणत्याही आव्हानाचा मुकाबला करण्यास सक्षम आणि सज्ज आहे, अशी ग्वाही हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी दिली. सोमवारी भारतीय हवाई दल दिनानिमित्त दिल्लीजवळील हिंदोन येथील तळावर आयोजित कार्यक्रमात धनोआ बोलत होते.

यावेळी धनोआ यांनी हवाई दलाच्या क्षमतांचा, आव्हानांचा आणि कार्याचा आढावा घेतला. हवाई दल केव्हाही, कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास तयार आहे. त्यासाठी शस्त्रास्त्रे आणि हवाई योद्धय़ांना सतत सज्ज ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. गेल्या काही वर्षांत हवाई दलाने आपली क्षमता वाढवली आहे. फ्रान्सकडून राफेल लढाऊ विमाने, रशियाकडून एस-४०० क्षेपणास्त्र, अमेरिकेकडून अ‍ॅपाची लढाऊ हेलिकॉप्टर आणि चिनुक ही अवजड मालवाहतूक हेलिकॉप्टर मिळाल्यानंतर हवाई दलाची मारकक्षमता अनेक पटींनी वाढणार आहे, असे धनोआ म्हणाले.

शांतता काळात होणाऱ्या विमानांच्या अपघातांकडे लक्ष वेधत त्यांनी ही बाब परवडणारी नाही आणि त्यावर नियंत्रण मिळवले पाहिजे असे सांगितले. शांतता काळात विमानांचे अपघात होणे हे केवळ महाग ठरत नाही तर त्याने युद्धकाळातील लढाऊ क्षमताही घटते. त्यामुळे अपघातांचे प्रमाण आणि मानवी चुकांचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जात आहे. अत्याधुनिक विमाने चालवण्यासाठी आणि त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यासाठी वैमानिक आणि तंत्रज्ञांना उच्चतम दर्जाचे प्रशिक्षण दिले जात आहे, असे धनोआ म्हणाले.

नुकत्याच पार पडलेल्या गगनशक्ती या युद्धसरावाचा उल्लेख करत धनोआ म्हणाले की, त्यातून हवाई दलाची दोन आघाडय़ांवर प्रभावीपणे लढण्याची क्षमता सिद्ध झाली. या युद्ध सरावात  १४,००० अधिकारी, १४,००० कर्मचारी आणि अनेक विमानांनी भाग घेतला. त्यात ११,००० उड्डाणे करण्यात आली. त्यापैकी ९,००० उड्डाणे केवळ लढाऊ विमानांची होती, असे ते म्हणाले.

शांतता काळात आणि नैसर्गिक संकटांदरम्यानही हवाई दलाने नागरिकांना मदत केल्याचे त्यांनी सांगितले. गतवर्षी तमिळनाडू, केरळ, जम्मू-काश्मीर, पंजाब, दिल्ली आदी ठिकाणी नैसर्गिक आपत्तींच्या वेळी हवाई दलाने मोलाची कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारच्या विकासाच्या आणि विभागीय दळणवळणाच्या सुविधा सुधारण्याच्या कार्यक्रमातही हवाई दल आपली भूमिका निभावत आहे. उडान प्रकल्पांतर्गत हवाई दलाच्या हवाईक्षेत्रातून ४५ उड्डाणमार्गाना परवानगी देण्यात आली आहे, तर सेनादलांच्या ३३ धावपट्टय़ा नागरी वापरासाठी खुल्या करण्यात आल्या आहेत, असे धनोआ यांनी सांगितले.