राफेल फायटर विमानांच्या खरेदी व्यवहारात सर्वोच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी सरकारला क्लीनचीट दिली आहे. पण काँग्रेस पक्षाच्या मते न्यायालयाच्या आदेशामुळे राफेल प्रकरणात गु्न्हेगारी चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे. “राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल सविस्तर समजून घेण्याऐवजी जल्लोष करण्याची भारतीय जनता पार्टीची सवय आहे” अशा शब्दात काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सूरजेवाला यांनी भाजपावर टीका केली.
भाजपा लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. निकालामुळे सविस्तर चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे. १४ डिसेंबर २०१८ किंवा आजच्या निकालामुळे भविष्यात या प्रकरणी कारवाई करण्यासाठी सीबीआयच्या मार्गात कोणताही अडथळा येणार नाही असे रणदीप सूरजेवाला पत्रकार परिषदेत म्हणाले. “राफेल प्रकरणात भविष्यात सीबीआय किंवा अन्य कोणतीही तपास यंत्रणा चौकशी करु शकते असे निकालाच्या पॅरा ७३ आणि ८६ मध्ये नमूद केले आहे” असे सूरजेवाला यांनी सांगितले.
फ्रेंच कंपनी डासूकडून ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याच्या व्यवहारात सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकराला क्लीनचीट दिली आहे. फ्रान्सच्या दसॉल्ट अॅव्हीएशन कंपनीकडून राफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या मुद्दय़ावर मोदी सरकारला निर्दोषत्व बहाल करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात गुरूवारी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने राफेल विरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळून लावली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 14, 2019 8:08 pm