पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात संरक्षण मंत्रालयाचे काम दलालीशिवाय चालते. बोफोर्स एक घोटाळा होता. राफेल हा राष्ट्रीय हित डोळयासमोर ठेऊन घेतलेला निर्णय आहे असे संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन शुक्रवारी लोकसभेत राफेलवरील चर्चेला उत्तर देताना म्हणाल्या. बोफोर्समुळे काँग्रेसची अधोगती झाली. पण राफेलमुळे भ्रष्टाचारमुक्त आणि नवीन भारत घडवण्यासाठी मोदी पुन्हा सत्तेत येतील असे सीतारमन म्हणाल्या.

राफेलसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला. त्यामध्ये आम्ही सर्वोच्च न्यायालयाची दिशाभूल केलेली नाही असे सीतारमन म्हणाल्या. मागच्या चारवर्षात या सरकारमध्ये एकही भ्रष्टाचार झालेला नाही असे सीतारमन यांनी सांगितले.

डीलमध्ये व्यावसायिक पक्षपातीपणा केलेला नाही. विमानाच्या किंमतीचा बारकाईने अभ्यास केला आहे. विमानाच्या बेसिक किंमतीसह वाढीव किंमतीची तुलना केल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निकालात म्हटल्याचे त्यांनी सांगितले. डीलमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी कोणताही आधार नाहीय हे सर्वोच्च न्यायालयानेच स्पष्ट केले आहे.

राफेल विमानांच्या खरेदीवरुन विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांना उत्तर देताना संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. मोदींच्या पराभवासाठी पाकिस्तानची मदत घ्यायला काँग्रेसला लाज नाही का वाटत ? असा सवाल त्यांनी विचारला.

राफेल विमानांबद्दलची प्रचार मोहिम असत्यावर आधारीत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ खासदार हवाईदल प्रमुखांना खोटारडे म्हणतात. नव्या फायटर विमानांमध्ये बसवण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांबद्दल सविस्तर माहिती मागितली जाते. हे सर्व गोपनीय कायद्यातंर्गत येते. विमानांची बेस किंमत आधीच सर्वांसमोर आली आहे असे सीतारमन म्हणाल्या.