केरळमध्ये परिचारिकेचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला तिच्या वरिष्ठ सहकारी विद्यार्थिनींनी जबरदस्तीने फिनाईल पाजल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर संबंधित विद्यार्थिनीची प्रकृती बिघडली असून, तिच्यावर कलबुर्गीमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अश्वथी असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. रॅगिग करण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचे तिच्या पालकांचे म्हणणे आहे.
अश्वथी ही परिचारिका पदवी अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. ती महाविद्यालयाच्या वसतीगृहामध्येच राहते. रॅगिग करण्यासाठी वसतीगृहातील इतर वरिष्ठ विद्यार्थिनींनी संबंधित मुलीला गाणे म्हणण्याची आणि डान्स करण्याची सूचना केली. तिने त्याला विरोध केल्यावर या विद्यार्थिनींनी जबरदस्तीने तिला स्वच्छतागृह साफ करण्यासाठी वापरण्यात येणारे फिनाईल पाजले. फिनाईल प्यायल्यामुळे तिची प्रकृती खालवली. त्यानंतर वसतीगृहाच्या संचालकांनी अश्वथीला खासगी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, वसतीगृहाच्या संचालकांनी रॅगिग झाल्याचा प्रकार फेटाळून लावला असून, अश्वथीने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे.