भाजप खासदार सुब्रमण्य स्वामी यांनी पुन्हा एकदा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन आणि भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांना पुन्हा एकदा टीकेचे लक्ष्य केले आहे. अमेरिकेकडून या दोन्ही ‘अतिसंकुचित वृत्तीच्या’ पदवीधरांना भारतावर लादण्यात आले आहे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले. राजन यांनी व्याजदर चढे ठेवल्यामुळे विकासाला खीळ बसत असल्याच्या मुद्द्यावरून स्वामी नेहमची टीका करत आले आहेत. तर बौद्धिक संपदेच्या मुद्द्यावरून अरविंद सुब्रमण्यम यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या माध्यमातून अमेरिकेला भारताविरोधी कारवाई करण्यास भाग पाडल्याचा आरोप स्वामी यांनी केला होता. अमेरिकेकडून व्यवस्थापनाची पदवी घेतलेल्या R3 ( रघुराम राजन) आणि AS ( अरविंद सुब्रमण्यम) यांना भारतावर लादण्यात आले आहे. या दोघांच्या व्यवस्थापनाची पद्धत सूक्ष्म (मायक्रो) असून ती भारताच्या अर्थव्यवस्थेशी (जनरल इक्विलीब्रिअम) सुसंगत नाही, असे स्वामी यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांत स्वामी यांनी राजन, अर्थमंत्री अरूण जेटली आणि अरविंद सुब्रमण्यम यांच्यावर टीकेची झोड उठविली होती. स्वामी यांच्या टीकेला केंद्र सरकारच्या असलेल्या मुकसंमतीमुळे राजन यांनी गव्हर्नरपदाची दुसरी टर्म स्विकारण्यास नकार दिला होता. येत्या ४ सप्टेंबर रोजी राजन गव्हर्नरपदावरून निवृत्त होत आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेचे गव्‍‌र्हनर रघुराम राजन यांना हटविण्यात यशस्वी ठरल्यानंतर खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन यांच्याकडे मोर्चा वळविला होता. वस्तू व सेवा विधेयकाबाबत काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमागे अरविंद सुब्रमण्यन यांचाच हात असून अशी व्यक्तींचा सरकारच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो असा आरोप करत स्वामींनी त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती.