रघुराम राजन यांच्या नावाचा विचार बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी केला जातो आहे अशी माहिती समोर येते आहे. यु.के. मधील ‘फायनान्शिअल टाइम्स’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार बँक ऑफ इंग्लंड च्या गव्हर्नर पदाचे जे संभाव्य उमेदवार आहेत त्या यादीत सर्वात चर्चेत नाव आहे ते रघुराम राजन यांचेच. बँक ऑफ इंग्लंडचे विद्यमान गव्हर्नर पुढच्या वर्षी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी कुणाला नियुक्त करायचे आहे याची प्रक्रिया ब्रिटनचे चान्सलर फिलीप हॅमंड सुरु करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रघुराम राजन हे आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर होते. आठवड्याभरापूर्वीच त्यांनी नोटाबंदीवर टीका करत नोटाबंदीचे हा काही सकारात्मक निर्णय नाही हे सरकारला सांगितले होते असे म्हटले होते. केंब्रिज मधील हार्वर्ड केनेडी स्कूल या ठिकाणी झालेल्या एका व्याख्यानात आरबीआयशी सल्ला मसलत न करता सरकारने जनतेवर नोटाबंदीचा निर्णय लादला अशीही टीका त्यांनी केली. याआधीही त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर वारंवार टीका केली आहे. नोटाबंदी हा निर्णय कसा चुकीच्या पद्धतीने घेतला गेला हे त्यांनी वारंवार सांगितले आहे. आपली परखड मते त्यांनी याआधीही मांडली आहेत.

रघुराम राजन हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अर्थ तज्ज्ञ आहेत. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे ते वयाच्या ४० व्या वर्षी प्रमुख झाले. २००५ मध्ये त्यांनी शोध निबंध सादर करून आर्थिक मंदीचा अंदाजही व्यक्त केला होता. त्यावेळी त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मात्र तीन वर्षांनी राजन यांनी व्यक्त केलेले भाकीत खऱे ठरले. अमेरिकासह जागतिक अर्थव्यवस्थेला आर्थिक मंदीचा फटका बसला. आता याच रघुराम राजन यांचे नाव बँक ऑफ इंग्लंडच्या गव्हर्नरपदासाठी चर्चेत आहे. राजन यांच्यासोबतच श्रिती वडेरा या ब्रिटनमधील राजकारणी आणि अर्थतज्ज्ञ असलेल्यांचेही नाव चर्चेत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raghuram rajan contender for top job at bank of england report
First published on: 23-04-2018 at 22:07 IST