News Flash

रशियाची सीरियातून माघार; शांतता बोलणीस पूरक स्थिती

क्रेमलिनने मात्र सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्यावर दबाव टाकल्याचा इन्कार केला आहे.

रशियाने सीरियातून आश्चर्यकारकरीत्या माघार घेतली असून त्यामुळे तेथील राजवटीशी शांतता बोलणी करणे सोपे होणार आहे. रशियाचे एक लढाऊ विमान आज मायदेशी परतले आहे. संयुक्त राष्ट्रांचे दूत स्टॅफन द मिस्तुरा यांनी रशियाची माघार ही महत्त्वाची घडामोड असल्याचे म्हटले आहे. जीनिव्हा येथे काल बोलणी सुरू झाल्यानंतर रशियाने घेतलेली माघार सकारात्मक आहे. सीरियात गेली पाच वर्षे संघर्ष सुरू आहे पण रशियाने माघार घेतली असली तरी पाश्चिमात्य देश त्याबाबत साशंक आहेत. याचा वाटाघाटींवर सकारात्मक परिणाम होईल अशी आशा मिस्तुरा यांनी व्यक्त केली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काल असा आदेश दिला की, सैन्य दलांनी सीरियाच्या महत्त्वाच्या भागातून माघारी यावे. क्रेमलिनने मात्र सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांच्यावर दबाव टाकल्याचा इन्कार केला आहे.

पुतिन यांनी काल सांगितले की, रशियाचे उद्दिष्ट साडेपाच महिन्यात पूर्ण झाले. एकूण ९००० विमान उड्डाणे झाली. क्रेमलिनने असाद यांच्या समर्थनार्थ सीरियात बॉम्बहल्ले सुरू केले होते. रशियाच्या हवाईतळावर विमान माघारी आले तेव्हा अनेक लोकांनी झेंडे फडकावले व वैमानिकांचे स्वागत केले. रशियाने त्यांचे हवाई व नौदल तळ सीरियात कायम ठेवले आहेत. वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, रशिया मुख्य ठिकाणी हल्ले सुरू ठेवणार आहे.

दहशतवादावर विजय मिळवल्याचा दावा सध्या तरी आम्ही करणार नाही, असे उपसंरक्षण मंत्री निकोलाय पानकोव यांनी सांगितले.पाश्चिमात्य देशांनी सावध प्रतिक्रिया दिली असून रशियाने माघारीचे वेळापत्रक निश्चित केले नसल्याचे म्हटले आहे. सीरियात रशिया प्रगत हवाई संरक्षण यंत्रणा कायम ठेवणार आहे, त्यामुळे रशियाच्या घोषणेवर विश्वास ठेवता येणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 2:00 am

Web Title: rahsia fighter plane back from syria
Next Stories
1 बचत खात्यावरील व्याज तिमाही जमा करा, रिझर्व्ह बॅंकेचे निर्देश
2 मदर तेरेसा यांच्या संतपदाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब
3 भारताशी बरोबरी करण्यासाठी पाक आणखी एफ-१६ विमाने खरेदी करणार
Just Now!
X