नागपूरमधील व्यापारी राहुल आग्रेकर यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी दुर्गेश बोकडेने शुक्रवारी दुपारी रायपूरमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. दुर्गेशने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

लॉटरी व्यावसायिक राहुल आग्रेकर यांचे २१ नोव्हेंबररोजी अपहरण करण्यात आले होते. बुटीबोरी येथे नेऊन त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दुर्गेश बोकडे आणि पंकज हारोडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणात बुधवारी कोलकाता येथील लॉजमधून पंकजला अटक केली होती. तर मुख्य आरोपी दुर्गेश हा पोलीस पोहोचण्यापूर्वीच तिथून पळून गेला. याप्रकरणी पोलिसांनी जॅकी प्रजापती (२२) यालाही अटक केली होती. जॅकीनेच या दोघांना पळण्यात मदत केली होती, असे समोर आले होते.

पंकज व दुर्गेशला जुगार व सट्ट्याचे व्यसन होते. दुर्गेश हा लॉटरी व सट्ट्याचा व्यवसाय करायचा. त्याच्यावर जवळपास २५ ते ३० लाखांचे कर्ज होते. तर पंकजही जुगारात ७ ते ८ लाख रुपये हरला होता. ते फेडण्यासाठी कर्जदारांचा दबाव होता आणि त्यामुळेच श्रीमंत व्यक्तीच्या अपहरणाची योजना आखली, अशी कबुली पंकजने पोलिसांना दिली. कोलकात्यातून पळालेला दुर्गेश झारखंडच्या रायपूरमधील गुप्ता लॉजमध्ये गेला. लॉजमधील खोलीत त्याने आत्महत्या केल्याचे शुक्रवारी सकाळी उघड झाले.

पंकजने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार आठ दिवस भटकंती सुरु होती. जवळचे पैसेही संपल्याने घरच्यांशी बोलताही येत नव्हते. त्यामुळे नागपूरमध्ये परतण्याचा विचार पंकजने केला. दुर्गेशने मात्र त्याला विरोध दर्शवला होता. यावरुन दुर्गेश व पंकजमध्ये वाद झाला आणि दुर्गेश मद्यप्राशन करुन कोलकात्यावरुन थेट रायपूरला गेला.