शेतकऱयांची सोन्यासारखी जमीन हडपण्याचा प्रयत्न मोदी सरकार करत असून देशात सध्या दिवसाढवळ्या सुटाबुटातल्या चोरांचा सुळसुळाट झाल्याचा घणाघात काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत केला. भूसंपादन विधेयकावरून राहुल गांधींनी लोकसभेत केंद्र सरकावर हल्लाबोल केला. एनडीएने भूसंपादन विधेयकाची हत्या केली असून शेतकऱयांची जमीन आपल्या उद्योगपती मित्रांसाठी हिसकावून घेण्याचा उद्देश सरकारचा असल्याची टीका राहुल यांनी केली. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या आकडेवारीचाही दाखला यावेळी राहुल यांनी लोकसभेत दिला. ते म्हणाले की, “देशात १०० पैकी फक्त ८ प्रकल्प जमिनीअभावी प्रलंबित आहेत. देशात जमिनींना सोन्याचे भाव येत असल्यामुळे शेतकऱयांकडून जमिनी हिसाकावून उद्योपतींना विकणे हाच खरा या विधेयकामागचा उद्देश सरकारचा असल्याचे यातून दिसून येते. मात्र, आम्ही कोणत्याही परिस्थितीत असे होऊ देणार नाही.” केंद्र आणि राज्य सरकारकडे जमीन आहे. ‘सेझ’ मध्ये ४० टक्के जमिनी संपादित केल्या, पण तरीही शेतकऱ्यांच्या जमिनी का हिसकावून घ्यायच्या आहेत? असा सवाल देखील राहुल यांनी यावेळी उपस्थित केला.