जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील(जेएनयू) देशविरोधी घोषणाबाजी करणाऱया विद्यार्थ्यांची बाजू घेणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे सुद्धा देशद्रोही असून, त्यांना गोळ्या घालून ठार केले पाहिजे, असे विधान राजस्थानातील भाजपचे आमदार कैलाश चौधरी यांनी केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून ‘जेएनयू’ वादावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात देशविरोधी घोषणाबाजी केल्यामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैय्या कुमार सध्या अटकेत असून, त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या वादात राजकीय नेत्यांनी उडी घेतल्याने हे प्रकरण चांगलेच गाजले आहे. राहुल गांधी यांनी विद्यापीठात जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली होती. त्यानंतर भाजप नेत्यांनी राहुल यांच्यावर जोरदार टीका केली.
दहशतवादी अफझल गुरूची प्रशंसा करणाऱया आणि देशविरोधी वक्तव्य करणाऱया विद्यार्थ्यांना भेट देऊन राहुल गांधी यांनीही देशद्रोही कृत्य केले आहे. त्यांना फासावर चढवायला हवे किंवा गोळ्या घालून ठार करायला हवे, असे बेधडक विधान भाजप आमदार कैलाश चौधरी यांनी केले. चौधरी यांच्या या विधानाचा व्हिडिओ देखील समाजमाध्यमांत व्हायरल झाला आहे.
खुद्द चौधरी यांनीही आपल्या विधानाला दुजोरा दिला आहे.  ते म्हणाले, हो, मीच हे वक्तव्य केले. राहुल गांधी जर देशद्रोह्यांना पाठिंबा देणार असतील, तर त्यांना गोळ्या घातल्याच पाहिजेत. मी राष्ट्रप्रेमी आहे आणि कोणी भारत मातेच्या विरोधात वक्तव्य करेल ते मी सहन करू शकत नाही, असेही चौधरी पुढे म्हणाले.
दरम्यान, कैलाश चौधरी यांच्या विधानावर काँग्रेस नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. कायद्याला हातात घेण्याची भाषा करणाऱया भाजपचा खरा चेहरा चौधरी यांच्या विधानातून समोर आला आहे, असे सांगत राजस्थान प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी चौधरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.