#ShahZyadaKhaGaya हा हॅशटॅग वापरत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित शाहजी अभिनंदन तुम्ही संचालक असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेने जुन्या नोटा बदलण्याच्या बाबतीत पहिला क्रमांक पटकावला आहे. पाच दिवसात ७५० कोटी रुपये, तुमची स्तुती करावी तेवढी थोडीच आहे असे म्हणत अमित शाह यांच्यावर राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. नोटाबंदीमुळे लाखो भारतीयांचे आयुष्य उद्धवस्त झाले. तुमची ही प्रगती वाखाणण्याजोगी आहे असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला आहे. शाह ज्यादा खा गया हा हॅश टॅग वापरून त्यांनी अमित शाह यांच्यावर टीका केलीये.

अमित शाह हे अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आहेत. या बँकेने सर्वाधिक नोटा बदलल्या आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यापासून अमित शाह यांची संपत्ती ८१ टक्क्यांनी वाढली असाही आरोप राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. @RahulGandhi या अधिकृत ट्विटर हँडलवरून राहुल गांधी यांनी अमित शाह यांच्यावर टीका केली.

नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर जुन्या नोटा जिल्हा सहकारी बँकेत जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी अहमदाबाद सहकारी बँकेत सर्वाधिक जुन्या नोटा जमा झाल्या. ज्याचे मूल्य ७५० कोटी रुपये होते, ही माहिती माहितीच्या अधिकारात मिळाल्याचे काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या या आरोपानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत अमित शाह यांना लक्ष्य केले आहे.

८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. ज्यानंतर चलनात असलेल्या ५०० आणि १ हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्यात आल्या. जुन्या नोटा बदलण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यावेळी १० नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या पाच दिवसात अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेत ७४५ कोटी रुपये जमा झाले, यामध्ये अनेक भाजपा नेत्यांची नावे आहेत जे सगळेजण अमित शाह यांचे निकटवर्तीय आहेत. असाही आरोप काँग्रेसने केला आहे.