भारतात शिक्षणाचा प्रसार होणे आवश्यक आहे तसेच नोकरीच्या संधीही निर्माण झाल्या पाहिजेत. मात्र प्रत्यक्षात भारतात फक्त तिरस्कार पसरवण्याचे काम होते आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. राहुल गांधी हे सध्या बहरीन दौऱ्यावर आहेत. त्या ठिकाणी झालेल्या भारतीय वंशाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. वर्षभरात नोकरीच्या संधी निर्माण न होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर घटले आहेत. गेल्या आठ वर्षातला निचांकी आकडा या सरकारने रोजगारनिर्मितीत गाठला आहे. त्यामुळे खरे आव्हान या संधी निर्माण करणे आणि शिक्षणाचा प्रसार करणे आहे. मात्र भारत सरकार हे लोकांमध्ये तेढ निर्माण करते आहे.

जनतेत फूट पाडणे हाच या मोदी सरकारपुढचा अजेंडा दिसतो आहे असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. आपल्या सगळ्यांच्या मायदेशावर काय संकट आले आहे त्याची कल्पना देण्यासाठी मी इथे उभा आहे असेही राहुल गांधी यांनी बहरीन येथील भारतीय वंशाच्या लोकांना उद्देशून म्हटले.

एवढेच नाही तर आपल्या भाषणात त्यांनी गुजरात विधानसभा निवडणूक निकालांचा उल्लेख करत भाजपवरही निशाणा साधला. गुजरात हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो आणि तिथून ते कसेबसे वाचले आहेत, त्यांचा हा विजय त्यांना निसटता मिळाला आहे या आशयाची टीका राहुल गांधी यांनी केली.

बहरीनमध्ये आल्यावर राहुल गांधी यांचे पीपल ऑफ इंडियन ऑरिजनच्या सदस्यांनी भव्य स्वागत केले. भारतीय वंशाच्या नागरिकांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याआधी राहुल गांधी यांनी प्रिन्स शेख सलमान बिन हमद अल खलीफा यांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी पंडित नेहरूंची काही पुस्तकेही खलीफांना भेट दिली.

कर्नाटक विधानसभा निवडणुका येत्या काही दिवसांमध्ये होणार आहेत. राहुल गांधी यांचा बहरीन दौरा याच संदर्भात असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मात्र १३ जानेवारीला होणाऱ्या बैठकीतच ते रणनीतीबाबत चर्चा करतील. या चर्चेनंतरच राहुल गांधी यांचा बहरीन दौरा आणि या निवडणुकांचे काही कनेक्शन होते का? या प्रश्नाचे उत्तर मिळू शकणार आहे. राहुल गांधी यांच्यासोबत माजी खासदार मधु गौडाही बहरीन दौऱ्यावर आले आहेत. त्याचमुळे या चर्चा रंगत आहेत.