उत्तर प्रदेश निवडणुकीत तुमच्या सोबत प्रियांका गांधी प्रचार करणार आहेत का ? असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला. तेव्हा ते म्हणाले. प्रियांका यांनी प्रचार करावा की नाही याचा निर्णय सर्वस्वी त्यांचा आहे. असे असले तरी प्रियांका या काँग्रेससाठी जमेची बाजू आहेत असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले. प्रियांका गांधी यांचा मला भक्कम आधार आहे असे ते म्हणाले. प्रियांकाची आपणास भरपूर मदत होते. जर तिला प्रचारात सहभाग घ्यायचा असेल तर तो तिचा निर्णय ठरेल परंतु ती काँग्रेसची जमेची बाजू आहे असे राहुल गांधी म्हणाले. समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने आज संयुक्त प्रचाराला प्रारंभ केला. त्यावेळी ते बोलत होते. पत्रकारांच्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.

मायावती यांचा आपण आदर करतो?

समाजवादी आणि काँग्रेसने आपल्यासोबत मायावती यांना का घेतले नाही असे विचारले असता अखिलेश यादव यांनी मायावती यांची खिल्ली उडवली. त्यांना खूप जागा लागली असती त्यांचे चिन्ह हत्ती आहे असे ते म्हणाले. राहुल गांधी यांनी म्हटले की आपण मायावती यांचा आदर करतो. त्यांच्या शासन काळात त्यांनी काही चुका केल्या असतील परंतु तरीसुद्धा मी त्यांचा आदर करतो असे राहुल गांधी म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मायावतींची तुलना होऊ शकत नाही असे ते म्हणाले. कारण, मायावतींचे विचार देशासाठी घातक नाहीत असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

नरेंद्र मोदी नंबर १…

पत्रकार परिषदे दरम्यान एका पत्रकाराने आपली ओळख आपण क्रमांक एकच्या वृत्तवाहिनीतर्फे आलो आहोत अशी करुन दिली. तेव्हा राहुल गांधींनी त्याची फिरकी घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. तुम्ही म्हणता तुमची कंपनी क्रमांक एकची आहे आणि इतर सर्व क्रमांक दोनवर आहेत. पंतप्रधान मोदी म्हणतात मीच क्रमांक १ वर आहे आणि दोन वर कुणीच नाही. राहुल गांधींनी मारलेल्या या कोपरखळीमुळे हॉलमधील सर्व जण हसले. अखिलेश यांनी देखील राहुल यांच्या विनोदाला दाद दिली.

राम मंदिराचा मुद्दा

हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. न्यायालय जे काही ठरवेल त्याप्रमाणे होईल असे ते म्हणाले. निवडणुकीच्या आधी भारतीय जनता पक्ष नेहमीच हा मुद्दा उकरुन काढतो असे ते म्हणाले.