राहुल गांधी हे कायमच माझे आणि सर्व कार्यकर्त्यांचे नेते राहतील, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी दिली. तसेच त्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देणे ही दुर्देवी बाब असल्याचेही ते म्हणाले. राहुल गांधी यांनी आपला चार पानी राजीनामा ट्विट केला होता. तसेच अखिल भारतीय काँग्रेस समितीकडेही सुपूर्द केला होता.

अहमद पटेल यांनी ट्विटरवरून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राहुल गांधी यांचा राजीनामा दुर्देवी आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवासाठी आम्ही सर्वजण जबाबदार आहोत. त्यांनी आपल्या छोट्या कार्यकाळात पक्ष मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे आणि अशाचप्रकारे ते कायम आमच्यासोबत राहतील असा पक्षाला विश्वास असल्याचे पटेल म्हणाले. राहुल गांधी कायमच माझे आणि आमचे नेते राहतील. तसेच पक्ष संघटनाही ते मजबूत करतील, असा विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेस कार्यकारिणी समिती राहुल गांधी यांचा राजीनामा स्वीकारेपर्यंत तेच काँग्रेसची धुरा सांभाळतील, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. राहुल गांधी यांनी चार पानी पत्र लिहून काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदी काम करण्याची संधी मिळाली हा आपल्यासाठी मोठा सन्मान असल्याचे सांगत येत्या काळात पक्षाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे. तसेच कर्नाटकातील मंत्री डी.के.शिवकुमार यांनीदेखील गांधी परिवाराशिवाय काँग्रेसला कोणीही एकजुट ठेवू शकत नसल्याचे म्हटले आहे. तसेच काँग्रेस एकजुट न राहिल्यास देशही एकजुट राहू शकणार नाही. पक्ष मजबूत आणि एकजुट ठेवण्यासाठी तसेच पक्षाची पुनर्बांधणी करून काँग्रेसला सत्तेत आणण्याचे काम गांधी कुटुंबच करू शकते असेही ते म्हणाले.