‘गांधी तेलंगणा विधानसभा निवडणूक जिंकण्याच्या बाता करत आहेत. त्याआधी त्यांनी आपले संसदीय क्षेत्र असलेल्या अमेठीमधील चार जागा तरी जिंकून दाखवाव्यात.’ असे आव्हान तेलंगणाचे मंत्री के.टी.रामाराव यांनी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना दिले आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचा मुलगा रामा राव यांनी बालनगर येथील एका कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांना हे आव्हान दिले. राव म्हणाले, राहुल जिथे गेले तिथे त्यांना आतापर्यंत अपयशच आले आहे. त्यामुळे राहुलच्या कुशलतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. राव म्हणाले, ‘राहुल गांधी राजकारणासाठी सुयोग्य नाहीत असे त्यांचे अपयशाचे रेकॉर्ड पाहून वाटते.’

राहुल गांधी यांनी १ जून रोजी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यावर हल्ला चढविला होता. राज्याची निर्मिती केवळ आपल्याच परिवाराच्या फायद्यासाठी झाली आहे का असा प्रश्न त्यांनी राव यांना विचारला होता. राज्य सरकारने आपल्या कामाची योग्य ती सुरुवात केलेली नाही आणि त्यांच्या कामाची दिशाही योग्य नाही. त्यामुळे तीन वर्षापासून तेलंगणामधील नागरिकांचे एकही स्वप्न पूर्ण करु शकलेले नाहीत.

तेलंगणा राज्याच्या निर्मितीसाठी विद्यार्थी आणि शेतकरी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. यामध्ये ३६९ विद्यार्थ्यांचा मृत्यूही झाला होता. या तरुणांनी तेलंगणाच्या निर्मितीसाठी मोठे योगदान दिले होते. हे तरुण एका परिवाराच्या निर्मितीसाठी लढले नव्हते असे राहुल गांधींनी म्हटले होते. सध्या तेलंगणा सरकारमध्ये चंद्रशेखर राव यांचा मुलगा के.टी. रामा राव तेलंगणा सरकारमध्ये मंत्री आहे. त्यांची मुलगी खासदार आहे. तर भाचा हरीश रावही मंत्री आहेत.