कर्ज बुडव्या विजय मल्ल्याने आपण देश सोडण्यापूर्वी अर्थमंत्री अरूण जेटलींना भेटलो होतो असा दावा केला. ज्यावरून जेटलींनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत, विजय मल्ल्या देश सोडून पळून जाणार हे अरूण जेटलींना ठाऊक होते असा आरोप केला. भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच काँग्रेसचे माजी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधींवर गंभीर आरोप केला आहे. पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून जाणारा नीरव मोदी राहुल गांधींना भेटला होता असा आरोप केला आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना मी खुलं आव्हान देतो की त्यांनी नीरव मोदीची भेट नाकारून दाखवावी. सप्टेंबर २०१३ मध्ये नीरव मोदी आणि राहुल गांधी यांची एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. या भेटीच्या वेळी मी तिथे हजर होतो. याच काळात बँकांनी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्सी यांनी मोठ्या प्रमाणावर कर्ज दिले होते. मी लाय डिटेक्टर टेस्ट करायलाही तयार आहे. तुम्ही माझे आव्हान स्वीकारणार का? असा प्रश्न शहजाद पूनावाला यांनी विचारला आहे.

विजय मल्ल्या ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून तर नीरव मोदी १३ हजार कोटींचे कर्ज बुडवून देश सोडून पळाले आहेत. विजय मल्ल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असताना आता शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधी आणि नीरव मोदी यांची भेट झाली असल्याचे सांगत खळबळ उडवून दिली आहे. आता या प्रश्नाला काँग्रेसतर्फे कसे उत्तर दिले जाणार ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.