प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीमधील राजपथावर होणारी परेड ही कायमच चर्चेत असते. तशीच ती आजही होती. मात्र या चर्चेबरोबर आणखी एका दृश्याची चर्चा चांगलीच रंगली. कारण सत्ताधारी पक्षातले मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी या कार्यक्रमाला शेजारी शेजारी बसले होते. या दोघांमध्ये मनसोक्त गप्पा झाल्या. नितीन गडकरी आणि राहुल गांधी यांच्यात गप्पा झाल्या म्हटल्यावर चर्चा होणार नाही असे होऊच शकत नाही.

लोकसभा निवडणुकांचं घोडामैदान जवळ आलं आहे. अशात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या दोन नेत्यांना एकत्र गप्पा मारताना पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. राजपथावरच्या संचलनासाठी आणि परेडसाठी नितीन गडकरी पत्नीसह कार्यक्रमाला हजर राहिले होते. त्यांच्या शेजारी बसलेली दुसरी महत्त्वाची व्यक्ती होती ती म्हणजे राहुल गांधी. परेड पहात असतानाच या दोघांमध्येही मनसोक्त गप्पा रंगल्या.

आता हे दोन नेते शेजारी बसून गप्पा मारत असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. राफेल कराराच्या मुद्द्यावरून राहुल गांधी सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाब विचारत आहेत. इतकंच नाही तर बेरोजगारी, गरीबी, शेतकऱ्यांचे प्रश्न यासंदर्भातही राहुल गांधी नरेंद्र मोदींना प्रश्न विचारत आहेत. त्यांच्यावर रोज टीका करत आहेत.दररोज हे घडत असताना 26 जानेवारीच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या परेडमध्ये गडकरी आणि राहुल गांधी हे नेमकं काय बोलत असतील याच्या विविध चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या.

राहुल गांधी एकीकडे मोदींवर टीका करत आहेत. लोकसभा निवडणुका मार्चच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होणार आहेत त्यानंतर काय होणार याचा अंदाज अजून तरी आलेला नाही. मात्र नितीन गडकरी हे त्यांच्या कामामुळे ओळखले जातात. त्यांचे काम ते करण्याचा धडाका विलक्षण आहे. आता अशा गडकरींशी राहुल गांधी यांनी नेमक्या काय गप्पा मारल्या? त्यांच्यात काय विषय होते या सगळ्याची चर्चा होणारच आहे.