काँग्रेसचे जम्मू काश्मीरचे प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर आणि प्रवक्ते रविंदर शर्मा यांना पत्रकार परिषद सुरू असतानाच पोलिसांनी अटक केली. काँग्रेस नेत्यांच्या अटकेचा राहुल गांधी यांनी निषेध व्यक्त करीत हा वेडेपणा कधी थांबणार, असा सवाल उपस्थित केला आहे.

जम्मू काश्मीरमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर आणि पक्षाचे प्रवक्ते रवींदर शर्मा यांनी शुक्रवारी जम्मूत पत्रकार परिषद बोलावली होती. पत्रकार परिषद सुरू असतानाच दोन्ही नेत्यांना जम्मू पोलिसांनी अटक केली. यांची माहिती काँग्रेसने ट्विटवरून दिली. पोलिसांच्या या कारवाईवर काँग्रेसचे नेते राहुल गांधीही चांगलेच भडकले. राहुल गांधी यांनी ट्विटरवरून याचा निषेध केला. राहुल म्हणाले, जम्मू काश्मीरचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गुलाम अहमद मीर आणि प्रवक्ते रवींदर शर्मा यांना जम्मूमध्ये केलेल्या अटकेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. एका राष्ट्रीय पक्षाच्याविरोधात केलेली ही कारवाई म्हणजे लोकशाहीवर आणखी एक हल्ला केला आहे. हा वेडेपणा कधी थांबणार आहे? असा संतप्त सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.

मोदी सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर राहुल गांधी या निर्णयावर आक्रमक झाले आहेत. काश्मीरातील हिंसाचारावरही राहुल गांधी आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या होत्या. यात मलिक यांनी राहुल गांधींना काश्मीरात येण्याचेही आमंत्रण दिले होते. त्यानंतर राहुल गांधी हे विनाअट काश्मीरात येण्यास तयार असल्याचेही म्हटले होते. दरम्यान, काश्मीरातील परिस्थिती पूर्वपदावर येत असताना काँग्रेसच्या नेत्यांवर झालेल्या कारवाईने राहुल गांधी चिडले आहेत.