काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसकडून या घटनेचा निषेध करण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ यांना कशाची भीती वाटत आहे अशी विचारणा काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. तर राहुल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेसचे गुजरातमधील नेते हार्दिक पटेल यांनाही ट्विटवरुन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना, ‘उत्तर प्रदेश किसी के पापा का नहीं हैं’ म्हणत सुनावले आहे.

कलम १८८ अंतर्गत नोएडा पोलिसांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघांनाही पोलिसांच्या गाडीमधून पुन्हा नवी दिल्लीच्या दिशेने घेऊन जाण्यात आलं. राहुल गांधी यांना हाथरसला जाण्यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नाही. राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हार्दिक पटेल यांनी उत्तर प्रदेशमध्ये जंगल राज सुरु असल्याची टीका केली आहे. “हा अंकाराच्या राजकारणाचा अंत आहे. उत्तर प्रदेश सध्या जंगल राज आहे. महिलांची सुरक्षा धोक्यात आहे. रोज महिलांवर अत्याचार होत आहे. सरकार आणि पोलीस तमाशा बघत उभे राहतात. लोकांचा आवाज मांडणाऱ्या राहुल गांधींना ताब्यात घेतलं जातं. उत्तर प्रदेश कोणाच्या वडिलांचं नाहीय,” असं ट्विट हार्दीक यांनी केलं आहे.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना सोबत करण्यासाठी दिल्ली-उत्तर प्रदेश सीमेवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पोलिसांनी यमुना एक्स्प्रेस-वेवर राहुल आणि प्रियंका गांधी यांना रोखलं. यावेळी फक्त दोघांनाच पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली होती आणि कार्यकर्ते व इतर नेत्यांना रोखण्यात आलं. पुढे गेल्यानंतर जेव्हा पुन्हा पोलिसांनी रोखलं तेव्हा मात्र राहुल गांधी आणि प्रियंका गांधी कार्यकर्त्यांसोबत पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून यावेळी घोषणाबाजी केली.