पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राफेल घोटाळ्यात अप्रत्यक्ष सहभाग आहे असा आरोप राहुल गांधी यांनी लोकसभेत केला. अनिल अंबानी यांचे नाव या करारात कसे आले? फ्रान्सचे अध्यक्ष म्हणत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नाव पुढे आणले असाही आरोप राहुल गांधी यांनी केला. लोकसभेत राफेलच्या मुद्द्यावर वादळी चर्चा सुरु आहे. अशात आता राहुल गांधी यांनी राफेल घोटाळा झाला असून त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अप्रत्यक्ष सहभाग होता असा आरोप त्यांनी केला.

 

कमिशन मिळालं नाही म्हणून काँग्रेसने राफेलचं डील केलं नाही असा आरोप संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन यांनी शुक्रवारी लोकसभेमध्ये राफेल मुद्यावर बोलताना केला. राफेलच्या निर्मितीचे कंत्राट एचएएला का दिले नाही ? अनिल अंबानीच्या कंपनीची निवड का केली ? असा प्रश्न वारंवार काँग्रेसकडून उपस्थित केला जातो. त्यावर निर्मला सीतारमन यांनी व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरचे कंत्राट तुम्ही एचएएलला का दिले नाही ? असा प्रतिप्रश्न केला. त्यामुळे लोकसभेत पुन्हा एकदा राफेलच्या मुद्द्यावरून रणकंदन झालेले पाहायला मिळाले. निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यानंतर राहुल गांधी बोलायला उभे राहिले. राफेल विमानांची किंमत सरकार जाहीर का करत नाही असा प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला. तसेच अनिल अंबानी यांनाच कंत्राट कसे मिळाले? असाही प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला. तसेच यासंदर्भात निर्मला सीतारामन यांनी उत्तर द्यावे असेही त्यांनी म्हटले आहे.