राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर नेहमी टीका करणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांशी संवाद साधताना आरएसएसचं उदाहरण देत त्यांच्याप्रमाणे काम करण्याची सूचना केली आहे. काँग्रेस पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारखा नसून हा पक्ष लोकांच्या भल्यासाठी झटणारा आहे. जर काही कुणाला काही शंका असतील, समस्या असतील तर त्या समोर आणाव्यात, त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. काँग्रेस व आरएसएसमध्ये हा फरक आहे असं राहुल गांधींनी म्हटलं आहे.

राहुल गांधी यांनी पक्ष बांधणीसाठी पक्षाच्या काही सदस्यांशी फोनवरुन संवाद साधला. यामध्ये जिल्हाध्यक्षांचाही समावेश होता. राहुल गांधी यांनी यावेळी जिल्हास्तरीय पक्षाची काय स्थिती आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना त्यांनी जिल्हाध्यक्ष आणि इतरांना आरएसएसचं उदाहरण दिलं.

यावेळी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना पक्षातील कार्यकर्त्यांचं बेशिस्त वर्तन आणि वरिष्ठ नेत्यांच्या अहंकार आणि लॉबीमुळे समस्या निर्माण होतं असल्याचं सांगत थेट राहुल गांधींकडेच तक्रार केली. वेगवेगळ्या राज्यातील काँग्रेस जिल्हाध्यक्षांनी राहुल गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त करत पक्षाला घऱचा आहेर दिला.

चर्चेदरम्यान जिल्हाध्यक्षांनी राहुल गांधी यांना पक्षातील काही वरिष्ठ नेते अहंकारी असून कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची तसदी घेत नसल्याची तक्रार केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढे बोलताना त्यांनी जिल्हास्तरीय नेते शिस्त राखण्यात अपयशी ठरत असून वरिष्ठ नेत्यांनी शिफारस केलेल्या लोकांना आयात केलं जात असल्याचा आरोप केला. तसंच ज्यांना पक्षात घेतलं जात आहे त्यांना जिल्हा समितीची काही चिंता नसल्याचाही आरोप त्यांनी केला.

पश्चिम बंगालमधील जलपैगुडी येथील एका जिल्हा सदस्याने तर काँग्रेस नेत्यांना खूप मोठा अहंकार असून, लोकांना भेटण्यात त्यांना काहीच रस नाही ज्याचा परिणाम पक्षावर होत असल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी राहुल गांधींकडे पश्चिम बंगालमधून निवडणूक लढण्याची विनंतीही केली.

ओडिशामधीलही एका नेत्याने काँग्रेस नेत्यांशी संपर्क साधणं फार कठीण असल्याची तक्रार केली. दुसरीकडे तेलंगणामधील वारंगल जिल्ह्यातील एका नेत्याने वरिष्ठ नेत्यांना आपली काहीच काळजी नसून त्यांची हैदराबाद आणि दिल्लीत लॉबी असून त्याच पातळीवर तिकीट वाटपाचा निर्णय घेतला जात असल्याची तक्रार केली.

सर्व तक्रारी ऐकून घेतल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षात शिस्त नसल्याच्या तक्रारीची दखल घेत पक्षात यापुढे जिल्हा समितीला जास्त महत्त्व दिलं जाईल आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत सहभागी करुन घेतलं जाईल असं आश्वासन दिलं.

‘जिल्हाध्यक्ष पक्षाचा कणा आहे. जिल्हास्तरावर पक्ष मजबूत करण्यासाठी आपण जिल्हाध्यक्षांशी चर्चा केली पाहिजे असं मला वाटतं. जिल्हाध्यक्षांनी रोज बैठका घेऊन चर्चा केली पाहिजे. आरएसएसप्रमाणे लोकांच्या भल्यासाठी ज्या समस्या आहेत त्या मांडत त्यावर उपाय शोधला पाहिजे. सर्व जिल्हाध्यक्षांना आपल्या जिल्ह्यात शिस्त राहावी यासाठी प्रयत्न करावा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा’, असा संदेश राहुल गांधी यांनी दिला आहे.