राहुल गांधी यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या राजवटीत देशाची स्थिती मरगळल्यासारखी झाली असून देशाला त्यामधून बाहेर पडण्याची प्रतीक्षा आहे आणि केवळ काँग्रेस पक्षच देशाला या स्थितीतून मार्ग दाखवू शकेल, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.

काँग्रेस पक्षाच्या महाअधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी केलेल्या भाषणांत राहुल गांधी यांनी रालोआ सरकारवर जोरदार टीका केली. रालोआ सरकार देशात तिरस्कार आणि संताप पसरवत असून रोजगारनिर्मिती आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यात अपयशी ठरले असल्याचा आरोपही गांधी यांनी केला.

केवळ काँग्रेस पक्षच देशाला एकसंध ठेवू शकेल आणि प्रगतीचा मार्ग दाखवू शकेल. सत्तारूढ पक्ष तिरस्कार आणि संताप पसरवत आहे तर आपला पक्ष प्रेम आणि बंधुभाव पसरवत आहे, असेही गांधी म्हणाले.

भूतकाळाचे विस्मरण होऊ न देता बदल घडविणे ही पक्षाची परंपरा असून आपल्या नेतृत्वाखालील पक्ष ज्येष्ठ नेते आणि युवकांना एकत्र घेऊन जात आहे. जर युवक काँग्रेस पक्षाला पुढे नेणार असतील तर अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनाविना ते शक्य नाही, त्यामुळे ज्येष्ठ नेते आणि युवकांना बरोबर घेऊन नवी दिशा देणे हे आपले काम आहे, असेही गांधी म्हणाले. काँग्रेसची विचारसरणी जिवंत ठेवण्यासाठी पक्षाच्या प्रतिनिधींनी लढा दिला, पक्षातील ज्येष्ठ नेते युवकांना मार्गदर्शन करून पक्षाला पुढे नेतील, असेही ते म्हणाले.

देशातील कोटय़वधी युवक नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहात असले तरी त्यांच्या हाती काहीही लागलेले नाही, रोजगार कसा उपलब्ध होणार ते युवकांना माहिती नाही तर शेतमालाला योग्य भाव कधी मिळणार ते शेतकऱ्यांना माहिती नाही, असेही गांधी म्हणाले.

काँग्रेसच पर्याय अशा प्रकारे देशात मरगळ आल्यासारखे वातावरण आहे आणि  त्यामधून बाहेर पडण्याची देशाला प्रतीक्षा आहे आणि केवळ काँग्रेसच देशाला प्रगतिपथावर नेऊ शकतो हे आपण मनापासून सांगत आहोत असेही गांधी यांनी सांगितले.