मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यानंतर भाजपाशासित राज्य गुजरातने ६.२२ लाख थकीत वीज बिल आणि आसाममध्ये ८ लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपा सरकारच्या या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. गुजरात आणि आसाममधील मुख्यमंत्र्यांना गाढ झोपेतून उठवण्यात काँग्रेस यशस्वी झाली आहे. मात्र, पंतप्रधान अजूनही झोपलेले आहेत. आम्ही त्यांनाही जागे करु, असे ट्विट त्यांनी केले आहे.

मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार सत्तेवर येताच शेतकऱ्यांचे ४१ हजार १०० कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले. निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे सत्तेवर येताच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु असे आश्वासन दिले होते. त्यानंतर भाजपाच्या आसाम सरकारने ८ लाख शेतकऱ्यांचे ६०० कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आणि गुजरात सरकारने ६.२२ लाख थकबाकीदारांचे ६२५ कोटी रुपयांचे कर्ज माफ केले. त्यानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत काँग्रेस गुजरात आणि आसामच्या मुख्यमंत्र्यांना गाढ झोपेतून जागे करण्यात यशस्वी झाल्याचे म्हटले.