देशाची ढासळत चाललेली अर्थव्यवस्था, घसरलेला जीडीपी यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे. २०२० आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये बांगलादेश भारताला मागे टाकेल असं भाकित आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं केलं असून, त्यावरून राहुल गांधी यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

चालू आर्थिक वर्षातील जीडीपीबद्दल अंदाज बांधणारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अहवाल प्रकाशित झाला आहे. या अहवालातून शेजारी राष्ट्र असलेला बांगलादेश भारताला मागे सोडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बांग्लादेश लवकरच भारताला ‘सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या’ (ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट अर्थात जीडीपी) बाबतीत पिछाडीवर टाकणार आहे. २०२० च्या आर्थिक वर्षात करोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) आकडेवारीनुसार बांग्लादेशच्या जीडीपीमध्ये चार टक्क्यांनी वाढ होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

आणखी वाचा- काय म्हणावं? दरडोई उत्पन्नात बांग्लादेश भारताला मागे टाकणार!

याच विषयावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. “भाजपाच्या द्वेषानं भरलेल्या सांस्कृतिक राष्ट्रवादाची ६ वर्षातील मोठी कामगिरी. बांगलादेशनं भारताला टाकलं मागे,” असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदी सरकारच्या धोरणावर टीका केली आहे.

सन २०२० मध्ये बांग्लादेशचा जीडीपी १.८८८ डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भारताचा जीडीपी उणे १०.५ टक्क्यांपर्यंत घसरणार असून, १.८७७ डॉलरपर्यंत जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मागील चार वर्षांमध्ये ही भारताची आर्थिक आघाडीवर सर्वात वाईट कामगिरी असणार आहे. असं झाल्यास भारत हा दक्षिण आशियामधील तिसरा सर्वात गरीब देश ठरेल. दक्षिण आशियातील गरीब देशांच्या यादीमध्ये पाकिस्तान आणि नेपाळ भारताच्यावर असतील. बांग्लादेशबरोबरच भूतान, श्रीलंका आणि मालदीवही जीडीपीच्या बाबतीत भारतापेक्षा सरस कामगिरी करतील असं सांगितलं जात आहे.