एकीकडे करोनामुळे देशातील वाढती रुग्णसंख्या, तर दुसरीकडे दररोज वाढत चाललेले पेट्रोल डिझेलचे दर यावरून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे. केंद्र सरकारनं अनलॉक जाहीर केल्यापासून करोनाच्या रुग्ण संख्येबरोबरच इंधनाचेही दर वाढत असल्याचं गेल्या काही दिवसांपासून दिसत आहेत. यावर बोट ठेवत “मोदी सरकारनं करोना महामारी, पेट्रोल डिझेलच्या किंमती अनलॉक केल्या आहेत”, असा टोला राहुल गांधी यांनी मोदींना लगावला आहे.

करोनामुळे देशातील आरोग्यावर व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारनं लॉकडाउन लागू केला होता. लॉकडाउन असेपर्यंत रुग्णवाढीचा वेग नियंत्रणात होता. मात्र, केंद्र सरकारनं अनलॉक जाहीर केल्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंता वाढत असताना त्यात पेट्रोल डिझेलच्या दरांनी भर टाकली आहे. मागील पंधरा दिवसांपासून करोनाची रुग्णसंख्या व इंधनाचे दर वाढत आहेत. त्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. आहे.

राहुल गांधी करोना, लॉकडाउन, गलवान व्हॅली, पेट्रोल डिझेलचे दर यावरून सरकारवर टीका करत आहेत. काही दिवस राहुल गांधी यांनी लॉकडाउन यशस्वी झाल्याचा दावा करत त्याचे आलेखही शेअर केले होते. आज केलेल्या ट्विटमध्ये राहुल गांधी यांनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमती व करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून सरकारला लक्ष्य केलं आहे. आलेख शेअर करत “मोदी सरकारनं करोना महामारी व पेट्रोल-डिझेलच्या किंमती अनलॉक केल्या आहेत,” अशी टीका राहुल यांनी केली आहे.

करोना रुग्ण व इंधन दराची सद्यस्थिती काय?

आत्तापर्यंत देशभरात १४ हजार ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, गेल्या चोवीस तासांमध्ये ३१२ मृत्यू झाले. रविवारी दिवसभरात सर्वाधिक ४४५ मृत्यू नोंदवले गेले होते. गेल्या चोवीस तासांमध्ये १४ हजार ९३३ नवे रुग्ण आढळले असून एकूण करोना रुग्णांची संख्या ४ लाख ४० हजार २१५ झाली आहे. दुसरीकडे देशभरात आज (२४ जून) पुन्हा एकदा इंधनाच्या दरात वाढ झाली. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १७ पैसे ते २० पैसे अशी वाढ झाली असून डिझेलच्या दरात प्रति लिटर ४७ ते ५५ पैसे अशी वाढ झाली आहे. महाराष्ट्रात पेट्रोलचे दर प्रति लिटर ८६.८५ रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर ७७.४९ रुपये इतका झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच पेट्रोलपेक्षा डिझेल महाग झालं आहे.