काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. करोनामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असून, त्याचा रोजगार वाढीलाही फटका बसला आहे. सरकारनं संसदीय समितीला माहिती देताना १० कोटी नोकऱ्या धोक्यात आल्याची माहिती दिली आहे. या मुद्यांवरून राहुल गांधी यांनी मोदींवर टीका केली असून, “मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत,” असा आरोप केला आहे.

वाणिज्य मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी बैठकीत केंद्रीय अधिकाऱ्यांना धोक्यात आलेल्या नोकऱ्यांबद्दल माहिती दिली. करोनाचा परिणाम झाल्यामुळे देशात १० कोटी नोकऱ्या संकटात असल्याचं केंद्र सरकारनं समितीला सांगितलं. हे वृत्त ट्विट करून राहुल गांधी यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. “मोदी देशाला उद्ध्वस्त करत आहेत. पहिली नोटाबंदी. दुसरी जीएसटी. तिसरी करोना महामारीत झालेली वाईट परिस्थिती आणि चौथ म्हणजे अर्थव्यवस्था व रोजगाराचा झालेला सत्यानाश. त्यांच्या भांडवलशाही माध्यमांनी मायाजाळ तयार केलं आहे. हे भ्रम लवकर तुटणार आहेत,” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

करोनानंतर गुंतवणुकीसमोरील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी वाणिज्य मंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत केंद्रीय अधिकाऱ्यांनी करोनाच्या झालेल्या परिणामांविषयी सादरीकरण केलं. यावेळी अधिकाऱ्यांनी समितीला सांगितलं की, करोना आणि लॉकडाउनमुळे देशातील जवळपास १० कोटी नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. नोकऱ्यांचा हा आकडा कधीपर्यंतचा आहे आणि कोणत्या क्षेत्रातील किती नोकऱ्या जाणार यांची माहिती अधिकाऱ्यांनी दिली नाही.