काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या दोन दिवस तामिळनाडू राज्याच्या दौऱ्यावर आहेत. नुकतेच निवडणूक आयोगाने तामिळनाडूसहीत चार राज्य आणि पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशासाठीच्या निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

रविवारी तामिळनाडू येथे बोलताना राहुल गांधी म्हणाले, “नरेंद्र मोदीप्रणित सरकारला चोरी करणे हे एकच काम माहिती आहे. हे सरकार लोकांकडून पैसे उकळण्यासाठी काहीही करायला तयार असते.”

मीठागरात काम करण्याऱ्या लोकांना उद्देशून राहुल म्हणाले की, आपल्याला येथे काम करणाऱ्या लोकांच्या परिस्थितीची, त्यांच्या कष्टाची, उद्भवणाऱ्या आरोग्याच्या समस्यांची जाणीव आहे. केंद्रात भाजपाप्रणित सरकार आल्यापासून संपत्ती वितरणात मोठ्या प्रमाणावर असमानता वाढली आहे.

गांधी पुढे म्हणाले की, कामगारांच्या कल्याणासाठी आमच्या पक्षाकडे एक योजना आहे. ज्या दरम्यान कामगारांकडे काम नसते त्यावेळी देशातल्या प्रत्येक गरीब कुटुंबासाठी किमान वेतन मिळवून देणारी न्याय्य योजना अंमलात आणण्याची आमची इच्छा आहे.

लाभार्थी कुठल्याही राज्याचा असो, कुठल्याही धर्माचा अथवा कोणतीही भाषा बोलणारा असो,जो पर्यंत तो गरीबीच्या कचाट्यातून सुटत नाही तोवर त्याच्या बँक खात्यामध्ये दरवर्षी ७२,००० रूपये जमा होत राहतील.