काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेल लढाऊ विमानं खरेदी प्रकरणावरुन केलेल्या टीकेला भाजपाने उत्तर दिलं आहे. राफेल मुद्द्यावर राहुल गांधी सपशेल खोटं बोलत असून ना त्यांचा भारतीय हवाई दलावर विश्वास आहे, ना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अशी टीका केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केली आहे. यावेळी त्यांनी राहुल गांधींना राफेलसंबंधी पाकिस्तानच्या प्रमाणपत्राची गरज आहे का ? असा खोचक प्रश्नही विचारला.

राफेल करारातील कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेली आहेत, असा धक्कादायक दावा केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात केला असतानाच यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. आधी राफेल करारात पैशांची चोरी झाली, आता फाईल चोरीला गेल्या आहेत. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात गुन्हा दाखल व्हायला हवा, मात्र, चोरी उघडकीस आणणाऱ्या माध्यमांवरच गुन्हे दाखल केले जात आहेत. याला‘अंधेर नगरी, चौपट राजा’ म्हणतात, अशा शब्दात राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधला.

रवीशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर टीका करताना म्हटलं आहे की, ‘राहुल गांधी यांचा भारतीय सुरक्षा दलांपेक्षा पाकिस्तानवर जास्त विश्वास आहे. राहुल गांधी सपशेल खोटं बोलत असून मी त्यांचा निषेध करतो. त्यांचा भारतीय हवाई दलावर विश्वास नाही. सर्वोच्च न्यायालयावरही त्यांचा विश्वास नाही. राफेल खरेदी प्रक्रियेत कोणताही घोटाळा झालेला नाही. राहुल गांधी कॅगवरही विश्वास ठेवण्यास तयार नाही’.

‘राहुल गांधींना राफेल प्रकरणी पाकिस्तानचं प्रमाणपत्र हवं आहे का ? तसं असेल तर मग आम्ही मदत करु शकत नाही’, असं रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे.