पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीडीपी व भाजप यांची युती करून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना वाव मिळेल अशी परिस्थिती निर्माण होऊ दिली त्यामुळे तेथे हिंसाचार वाढला आहे असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी येथे केला.

बर्कले येथे कॅलिफोर्निया विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, ‘मोदी यांनी भाजप व पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष (पीडीपी) यांची जी युती केली ती मोठी चूक होती. पीडीपीने काश्मीरमधील तरुणांना राजकीय प्रक्रियेत आणण्याचे प्रयत्न केले त्यात त्यांना यशही येत होते, पण ज्या दिवशी मोदी यांनी भाजप व पीडीपी यांची युती घडवून आणली त्यावेळी पीडीपीच्या तरुणांना राजकीय प्रक्रियेत आणणारा पक्ष म्हणून स्थान संपुष्टात आले.’

‘पीडीपी व भाजप युतीमुळे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मोकळा वाव मिळाला. नंतर हिंसाचारातही वाढ झाली. पीडीपीचे अनेक सदस्य नंतर दहशतवाद्यांना जाऊन मिळाले अशी माहिती काश्मीरमधील गुप्तचरांनी मला दिली’, असा दावा गांधी यांनी केला.

ते म्हणाले की, ‘संकुचित राजकीय फायद्यासाठी भाजप व पीडीपी युती झाली व त्यामुळे देशाचे मात्र मोठे नुकसान झाले, त्यामुळे आता जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनाच नव्हे तर इतरांनाही मोकळे रान मिळाले आहे, या धोरणात्मक चुकीची मोठी किंमत भारताला मोजावी लागली.’

‘मनमोहन सिंग पंतप्रधान असताना मी काश्मीरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी पडद्यामागून प्रयत्न केले व नंतर दहशतवादी कारवाया खूपच कमी होऊन पर्यटन वाढले होते’, असा दावा त्यांनी केला.