काळ्या पैशाची उलाढाल करणाऱ्यांना सोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी गरिब जनतेला त्रास देत असल्याची टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. नोटबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलत होते. मोदी यांनी कोणताही विचार न करता हा निर्णय घेतला असून त्यामुळे गरिब जनतेला त्रास होत असल्याचा पुनरुच्चार राहुल गांधी यांनी केला. नोटबंदीच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्ट करताना निर्णय घेण्यापूर्वी मोदींनी भाजप नेत्यांना सतर्क केले होते का? या सवालाच्या चौकशीची मागणी केली. यासाठी त्यांनी सोशल मीडियात फिरणाऱ्या फोटोचा दाखलाही दिला. विजय मल्या, ललित मोदी यांच्यासारख्या देशाला फसविणाऱ्या मंडळींवर कारवाई करायची सोडून मोदी गरिबांना त्रास दायक निर्णय घेतल्याचे राहुल गांधीनी म्हटले.

भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नोटबंदी केली असेल तर ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करुन २००० रुपयाची नोट चलनात आणण्यामागे काय प्रयोजन आहे. ते मोदींनी स्पष्ट करावे, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विचार करुन निर्णय घेणे आवश्यक असते. पण नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय घेताना कोणताही विचार केला नसल्याचे ते म्हणाले.

जनतेला त्रास होत असल्यामुळे मोदींवर टीका करणाऱ्या राहुल गांधी मोदींच्या आईनी बँकेतून पैसे काढण्याबाबत प्रतिक्रिया विचारण्यात आली. यावेळी त्यांनी मोदींच्या आईविषयी बोलण्यावर मौन बाळगले. मंगळवारी सकाळी मोदी यांच्या ९४ वर्षी आईने रांगेत उभे राहुन नोटा बदलून घेतल्या होत्या.