काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा टीकाकारांचे लक्ष्य झाले आहेत. यावेळी मुद्दा आहे तो राष्ट्रपतींनी आज लोकसभेच्या संयुक्त सत्रात केलेल्या अभिभाषणाकडे दुर्लक्ष करून मोबाइलमध्ये दंग राहण्याचा. राष्ट्रपतींच्या एक तासाच्या अभिभाषणादरम्यान राहुल गांधी हे जवळपास २४ मिनिटं मोबाइलमध्ये गुंतलेले दिसले असल्याचे बातमी इंडिया टुडेने दिली आहे.

युपीए अध्यक्षा सोनिया गांधी मात्र अभिभाषण नीट ऐकत होत्या, शिवाय त्या अभिभाषणास प्रतिसाद देखील देत होत्या. राष्ट्रपतींनी अभिभाषणादरम्यान जे काही विषय मांडले त्यास राहुल गांधींनी प्रतिसाद देखील दिला नसल्याचे दिसून आले. एवढेच नाहीतर राष्ट्रपती कोविंद हे जेव्हा सरकारने पाच वर्षात केलेल्या कामांबद्दल माहिती देत होते, त्यावेळी राहुल गांधी हे लोकसभेचे फोटो काढताना व जवळपास २० मिनिटं सोनिया गांधी यांच्याशी बोलताना आढळले.

जेव्हा राष्ट्रपतींनी उरी सर्जिकल स्ट्राईक आणि बालाकोट स्ट्राईक बद्दल सांगितले, तेव्हा संपूर्ण सभागृहाने व सोनिया गांधींनी देखील बाक वाजवून प्रतिसाद दिला, मात्र यावेळी राहुल गांधींनी आपले खाली पाहणे सोडले नाही. यामुळे सोनिया गांधींनी त्यांना काही वेळा बघितले देखील मात्र राहुल गांधी तरीदेखील तसेच बसून होते.