पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरल्यामुळे एकमेकांशी कुत्र्या-मांजराप्रमाणे किंवा साप-मुंगूस यांच्या प्रमाणे लढणारे विरोधकही एकवटलेत, अशी टिका भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली होती. त्या टिकेला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी खरमरीत उत्तर दिले आहे. अमित शाह यांनी विरोधकांबाबत अनुद्गार काढून त्यांच्या मनात असलेला अनादरच समोर आणला आहे. त्यांची सडकी मनोवृत्तीच या निमित्ताने समोर आली आहे असेही गांधी यांनी म्हटले आहे. तुम्ही सत्ताधारी आहात मान्य आहे पण विरोधकांचाही आदर करायला हवा, असे म्हणत अमित शाह यांचे बोलणे फारसे मनावर घेऊ नका असा खोचक सल्लाही राहुल गांधी यांनी दिला.

कर्नाटक विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत त्याच अनुषंगाने दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडायला सुरुवात केली आहे. शुक्रवारी मुंबईत झालेल्या महामेळाव्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला होता. तसेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे शरद पवारांनी सांगितले की मगच पंतप्रधान आणि भाजपाविरोधात बोलतात अशीही टीका केली होती. मात्र या सगळ्या टीकेचा खरपूस समाचार राहुल गांधी यांनी घेतला. जे आमच्यावर टीका करत आहेत आम्हाला प्राण्यांची उपमा देत आहेत ते अमित शाह, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे धोरण आणि मनोवृत्ती सडक्या विचारांची आहे हेच यावरून सिद्ध होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह हे दोघेच फक्त कोणतेही प्राणी नाहीत असेच म्हणावे लागेल म्हणत राहुल गांधी यांनी शाह यांच्या वक्तव्यावर टीका केली. अमित शाह यांची मानसिकताच घाणेरडी आहे. फक्त दोन ते तीन व्यक्तींना पक्षात महत्त्व आहे. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी एवढेच काय नितीन गडकरी यांनाही भाजपामध्ये किंमत दिली जात नाही. तर देशातील दलित जनतेला, मागासवर्गीयांना, अल्पसंख्य लोकांना किंमत कशी मिळणार? असाही प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केला. शुक्रवारी झालेल्या भाजपाच्या महामेळाव्यात अमित शाह यांनी कर्नाटक विधानसभा निवडणूक आणि २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुका भाजपाच जिंकणार आहे असा आत्मविश्वास व्यक्त केला. मात्र अमित शाह यांचे बोलणे फार मनावर घेऊ नका असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.