काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मातोश्री परदेशातून आल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकत नाही, असे सांगत बहुजन समाज पक्षाने सोमवारी पंतप्रधानपदासाठी मायावतींचे नाव पुढे केले आहे. त्यामुळे विरोधकांना एकत्र आणून महाआघाडी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला हादरा बसला आहे.

बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा सुरु असून या मेळाव्यात लोकसभा निवडणुकीत पक्षाचे धोरण काय असेल, यावर चर्चा झाली. पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक वीर सिंह आणि जयप्रकाश सिंह यांनी पंतप्रधानपदासाठी मायावतींचे नाव पुढे केले. ‘आता पंतप्रधानपदावर मायावतींनी विराजमान होण्याची वेळ आली आहे’, असे मत या नेत्यांनी व्यक्त केले आहे. मायावतीच मोदींना टक्कर देऊ शकतात, असेही बसपने म्हटले आहे.

कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांच्या सरकार स्थापनेत मायावतींनी मोलाची भूमिका निभावली होती. राष्ट्रीय राजकारणात मायावतींनी छाप पाडली असून नरेंद्र मोदी आणि अमित शहांना फक्त ‘दबंग’ मायावतीच रोखू शकतात, असे जयप्रकाश सिंह यांनी म्हटले आहे.

मायावती फक्त दलित समाजाच्या नेत्या नाहीत, त्यांना समाजातील प्रत्येक वर्गाचा पाठिंबा आहे, असेही ते म्हणालेत. राहुल गांधी हे त्यांच्या आईसारखेच दिसतात. त्यांची आई परदेशी असून यामुळे राहुल गांधी देखील पंतप्रधान होऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. मायावतींचा तळागाळातील जनतेशी संपर्क असून त्या चार वेळा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीदेखील होत्या. त्यामुळे पंतप्रधानपदावर काम करण्याची क्षमता मायावतींमध्येच आहे, असेही त्यांनी सांगितले.

दलित मतांसाठी काँग्रेसला मायावतींची गरज भासू शकते. त्यामुळे बसपला सोबत घेऊन मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकींना सामोरे जाण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. मात्र, बसप नेत्यांनी पंतप्रधानपदासाठी थेट मायावतींचे नाव पुढे केल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत.

दुसरीकडे, जयप्रकाश सिंह यांच्यावर मायावतींनी कारवाई केली आहे. जयप्रकाश यांच्या विधानाने वाद निर्माण झाला होता. या वादानंतर मायावतींनी जयप्रकाश यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.