लोकसभा निवडणूकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींच्या नेतृत्व गुणांवर पक्ष नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले होते, तर काहींनी उघडपणे टीका करत काँग्रेसच्या पराभवाचे खापर राहुल गांधी यांच्यावर फोडले होते. आता लोकसभेत महागाईच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना राहुल गांधींनी झोप अनावर झाल्याने चक्क ताणून दिल्याने नव्या वादाला तोंड फोडले आहे.
रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सादर केलेला रेल्वे अर्थसंकल्प ‘आशाहीन’ असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली होती. परंतु, बुधवारी राहुल गांधींनी लोकसभेचे कामकाज सुरू असताना चक्क डुलकी काढून पक्षाच्या प्रतिमाला धक्का पोहोचविण्याचे काम केले.
लोकसभेच्या कामकाजादरम्यान काँग्रेसचे एक खासदार आपल्या भाषणात सामान्य माणसाची बाजू लावून धरत असताना त्यांच्यामागे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा मात्र डोळा लागला होता. लोकसभेच्या कामकाजाच्या व्हिडिओमध्ये हे समोर आले आहे. लोकसभेतील या प्रसंगामुळे राहुल गांधी यांनी स्वत:वर आता नवा वाद ओढावून घेतला आहे. दरम्यान, राहुल गांधी झोपले नव्हते असे स्पष्टीकरण पक्षाने दिले आहे.