06 March 2021

News Flash

काँग्रेसचा विजयनिर्धार

२०१९मध्ये ‘दिल्ली’जिंकणारच- राहुल गांधी; लोकसभा निवडणुकीचे बिगूल

२०१९मध्ये ‘दिल्ली’जिंकणारच- राहुल गांधी; लोकसभा निवडणुकीचे बिगूल

रामलीला मैदानावर रविवारी झालेल्या विराट सभेत काँग्रेसने लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजवले! ‘कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांतील आगामी विधानसभा काँग्रेस जिंकेल. इथून पुढे होणारी प्रत्येक निवडणुकीत पक्ष विजयी होईल आणि २०१९ मध्ये होणारी लोकसभा निवडणूक फत्ते करून दिल्ली सत्ता स्थापन करणारच’, असा निर्धार पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला.

या सभेला काँग्रेसने ‘जनआक्रोश मोर्चा’ असे संबोधत मोदी सरकारच्या धोरणांवर प्रहार केला. भ्रष्टाचार, महिलांची सुरक्षा, बँकांची दुरवस्था, आर्थिक घोटाळे अशा महत्त्वाच्या प्रश्नांवर पंतप्रधान मोदी कोणतीही ठोस भूमिका मांडत नसल्याची टीका राहुल यांनी केली. या सभेला सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसचे तमाम ज्येष्ठ नेते उपस्थित होते. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर काँग्रेसने सभा आयोजित करून भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पक्षाध्यक्ष बनल्यानंतर दिल्लीत झालेली राहुल यांची ही पहिलीच सभा होती.

आत्ताचा काळ मोठा कठीण-सोनिया गांधी

सध्या देशात हिंसाचार आणि द्वेष वाढू लागला असून सर्व स्तरातील लोक पिचले जात आहेत, हे पाहून खरोखरच दुख होते. मोदीच्या कार्यकाळात देश अत्यंत अस्थिरतेतून, बिकट परिस्थितीतून जात आहे. या सत्तेविरोधात संघर्ष करण्यासाठी आपण एकत्र येण्याची गरज आहे, असे आवाहन काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले.

राहुल यांचे मोदींवर आरोप

  • लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोच्च न्यायलयाला हस्तक्षेप करावा लागत आहे.
  • विदेशात असताना पंतप्रधानांना महिलांच्या सुरक्षा जपण्याचे आवाहन करावे लागले.
  • भाजप आणि संघ एकत्रितपणे लोकांमध्ये द्वेष व भीती निर्माण करत आहेत. या दोघांची यंत्रणा व मोदी काँग्रेसबद्दल गैरसमज पसरवत आहेत.
  • गेली ७० वर्षे काँग्रेसने देश एकत्र राहावा यासाठी झोकून दिले आहे. भाजप मात्र नेमके उलटे काम करत आहे.
  • मोदी सरकार उद्योजकांचेच आहे. काँग्रेस शेतकऱ्यांच्या मागे उभा नसता तर मोदींनी त्यांच्या जमिनी लाटल्या असत्या.

हा तर कुटुंब आक्रोश मोर्चा – अमित शहा :

‘जनआदेशा’मुळेच घराणेशाही आणि त्यांच्या शिलेदारांचा पक्ष सत्तेतून बाहेर फेकला गेला. या जनआदेशाला ‘जनआक्रोश’ मानून काँग्रेस लोकांची फसवणूक करत आहे. हा मोर्चा म्हणजे कुटुंब आक्रोश मोर्चा आहे. कित्येक वर्षे काँग्रेस पक्ष सत्तेवर होता. या पक्षाने देशाचे नुकसान केले आहे. आता जनतेची माफी मागावी, अशी टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ट्वीटद्वारे केली आहे.

मानसरोवरला जाणार!

‘हेलिकॉप्टरमध्ये बिगाड झाल्यामुळे ८ हजार फुटांवरून ते झपाटय़ाने खाली येत होते, तेव्हा माझ्या मनात आले की, मानसरोवरला गेले पाहिजे. कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर मी जाणार आहे’, असे राहुल म्हणाले.

मोदींच्या भाषणात ना वजन असते ना पारदर्शकता. भाषण ऐकणाऱ्याला त्यांच्या वक्तव्यातील सत्य शोधणेच कठीण जाते.. केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांच्या संशयात्मक आर्थिक व्यवहारांवर मोदी बोलले नाहीत. चीनभेटीत डोकलामवर मौन बाळगले. हे कसले पंतप्रधान आहेत?   – राहुल गांधी, काँग्रेस पक्षाध्यक्ष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2018 12:57 am

Web Title: rahul gandhi comment on bjp
Next Stories
1 येरवड्यातील महापालिका शाळेच्या पाण्याच्या टाकीत पडून दोन मुलांचा मृत्यू
2 भारत-पाकदरम्यान पहिल्यांदाच होणार युद्ध सराव; चीनसह अनेक देश होणार सहभागी
3 बिहारमध्ये नदीत होडी बुडाल्याने ८ जणांचा मृत्यू; बचाव कार्य अद्याप सुरु
Just Now!
X