राहुल गांधी यांचे पंतप्रधानांना आवाहन; बुंदेलखंडमध्ये काँग्रेसची पदयात्रा
दुष्काळग्रस्त बुंदेलखंडमध्ये पदयात्रा काढून काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मोदी यांनी केवळ बडय़ा उद्योगपतींचाच विचार न करता शेतकरी आणि कामगार वर्गाकडेही लक्ष द्यावे आणि मागास भागाला अधिक निधी उपलब्ध करून द्यावा, असे राहुल गांधी म्हणाले.
हैदराबादमधील विद्यार्थी रोहित वेमुलाने केलेल्या आत्महत्येबद्दल मोदी अत्यंत भावूक झाले, त्याचा उल्लेख करून राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांनी शेतकऱ्यांबद्दलही अशीच संवेदना दाखवावी. कच्च्या तेलाच्या दरामध्ये घट झाल्याने सरकारच्या ज्या पैशांची बचत झाली असेल तो पैसा या भागाकडे वळवावा, असेही राहुल गांधी म्हणाले.
मोदी यांनी भाषणांत आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचा उल्लेख केला तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याचा उल्लेख करून गांधी म्हणाले की, मोदी तुम्ही जे अन्न सेवन करता ते अन्न शेतकरी पिकवितात, डाळ २२० रुपये दराने विकली जाते, ती शेतकरी उपलब्ध करून देतो. त्यामुळे शेतकऱ्यांचाही थोडा विचार करा, असे गांधी म्हणाले.