पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भ्रष्टाचाराला विरोध नाही, तर अप्रत्यक्षपणे मूक संमतीच आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. मेघालयात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राहुल आले आहेत. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पीएनबी बॅंक  घोटाळ्याच्या मुद्दय़ावर विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधानांना थेट लक्ष्य केले. यापूर्वीही राहुल यांनी घोटाळाप्रकरणी मोदींनी मौन बाळगल्याबद्दल टीका केली होती. ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी नीरव मोदी संबंधित घोटाळ्यावर बोलावे, अशी सूचना राहुल यांनी केली होती. जनतेकडून तुम्ही प्रश्न व अपेक्षा विचारता तेव्हा, तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक भारतीयाची सध्या काय अपेक्षा आहे? नीरव मोदीने केलेली लूट, ५८ हजार कोटींचा राफेल करार याबाबत तुम्ही मन की बातमध्ये प्रकाश टाकावा, असा टोलाही राहुल यांनी लगावला.

‘लोकशाही गायब करतील’

नरेंद्र मोदी उत्तम जादूगार आहेत. ते लोकशाहीदेखील गायब करतील, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. त्यांचा रोख हा उद्योगपती विजय मल्या व नीरव मोदी हे देशाबाहेर पळून जाण्याकडे होता. राहुल यांच्या मेघालयातील जौसी येथे प्रचारसभा झाली. सभेत त्यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले. पंतप्रधान जादूगाराची एक प्रतिमा घेऊन वावरतात. क्षणात काही गोष्टी ते गायब करतात अशी टीका राहुल यांनी केली.