पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशच्या जनतेची फसवणूक केली. त्यांनी फक्त मध्य प्रदेशच्याच नव्हे तर संपूर्ण देशाची फसवणूक केली. नोकरी देण्याचे त्यांनी खोटे आश्वासन दिले असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदसौर येथील जाहीर सभेत केला. मागच्यावर्षी मध्य प्रदेशात मंदसौर येथे झालेल्या गोळीबारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची राहुल यांनी भेट घेतली.

मध्य प्रदेशमध्ये आम्ही सत्तेत आलो तर शेतकऱ्यांना सुरक्षित करणे हे आमचे पहिले काम असेल. मध्य प्रदेशात काँग्रेसचे सरकार आले तर १० दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करु अशी घोषणा राहुल यांनी केली. पंतप्रधान मोदी आणि भाजपाला शेतकऱ्यांची चिंता नाही हे सत्य आहे. श्रीमंत बिझनेसमॅन मित्रांना मदत करायला ते प्रथम प्राधान्य देतात.

काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास १० दिवसात न्याय मिळेल. ज्यांनी शेतकऱ्यांवर गोळया चालवल्या आहेत. त्यांच्यावर कारवाई करुन दाखवू असे राहुल म्हणाले. पंतप्रधान मोदींनी पंधरा उद्योगपतींचे १.५ लाख कोटींचे कर्ज माफ केले. पण मी त्यांना शेती कर्ज माफ करायला सांगितले त्यावर ते मौन होते असे राहुल म्हणाले.

मी जेव्हा कॅप्टन अमरींदर सिंग, सिद्धारामय्या यांना सांगितले तेव्हा कर्नाटक आणि पंजाब सरकारने दहा दिवसात शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले असे राहुल यांनी सांगितले. माझ्यासाठी सर्वात प्रथम या देशाची जनता आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आणि माझे तिसरे प्राधान्य काँग्रेस नेत्यांना आहे असे राहुल म्हणाले. पाच-सात वर्षानंतर मी जेव्हा पुन्हा इथे येईन तेव्हा माझ्या हातात असलेल्या फोनवर मला ‘मेड इन मंदसौर’ लिहिलेले पाहायचे आहे. नरेंद्र मोदी आणि शिवराज सिंह चौहान हे करु शकणार नाहीत. पण कमल नाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया हे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकतात असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले.