देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तडाख्यात सापडला आहे. फेब्रुवारीपासून महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये करोनाच्या उद्रेकाला सुरूवात झाली आणि आज देशातील परिस्थिती बिकट बनली आहे. बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीरसाठी ओरड सुरू आहे. दररोज हजारो रुग्णांचे जीव जात आहेत. सर्वोच्च न्यायालय आणि विविध ठिकाणची उच्च न्यायालये व्यवस्थापनातील गोंधळावरून दररोज सरकारचे (केंद्र आणि राज्य) कान पकडत आहे. असं एकूण चिंताजनक चित्र निर्माण झालेलं असून, काँग्रेसनं एक जुना व्हिडीओ ट्विट करत देशातील नागरिकांना आवाहन केलं आहे. करोना त्सुनामीचा इशारा देणारा राहुल गांधी यांचा हा व्हिडीओ असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाषणाचाही यात समावेश केलेला आहे.

देशात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी एक ट्विट केलं आहे. ज्यात त्यांनी मुद्दा अधोरेखित केला असून, राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या करोनाबद्दलच्या भाषणाचा व्हिडीओही शेअर केला आहे. “आवश्य बघा, विचार करा आणि ठरवा! भारतातील करोनाच्या दुसऱ्या लाटेचं सत्य. राहुल गांधी बरोबर बोलले होते का?, नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व खोट्यावर टिकलेलं आहे का? देशाला काय हवंय? आजच भविष्याविषयी विचार करणारं नेतृत्व की, धोका देणारं आणि टीव्हीवरील भाषणावर टिकलेलं?, निर्णय तुमचा आहे,” असं म्हणत सुरजेवाला यांनी देशवासीयांना आवाहन केलं आहे. त्याचबरोबर व्हिडीओही ट्विट केला आहे.

व्हिडीओत राहुल गांधी काय म्हणालेत?

रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओत राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करोनासंदर्भातील भूमिका आहेत. हा व्हिडीओ मार्च २०२० मधील असून, भारतात करोनाचा शिरकाव होण्यापूर्वीचा आहे. यात राहुल गांधी म्हणत आहेत की,’देशाने आतापर्यंत जे काही सोसलं आहे, हे त्याच्यापेक्षाही त्रासदायक होणार आहे. एक मोठी त्सुनामी येणार आहे, असा इशारा मी सरकारला वारंवार देत आहे. आणि सरकारला याचा कोणताही अंदाज नाहीये. भारताने यासाठी तयारी करायला हवी, फक्त करोनाच नाही, तर… मला हे सांगताना वाईट वाटतंय की, मी हे वारंवार हे बोलतोय पण माझं कुणी ऐकत नाहीये. पुढील काही महिन्यात देशवासीयांना मोठ्या दुःखातून जावं लागणार आहे. मला आपल्या शक्तीचा अंदाज आहे आणि त्यामुळे आपली ताकद सशक्त करण्यावर भर द्यायला हवा. कारण असं नाही केलं, तर खूप मोठा विध्वंस होणार आहे. मी पंतप्रधानांना सांगत आहे की, त्यांनी वाळूतून आपलं डोकं वर काढावं आणि आजूबाजूला काय सुरू आहे हे बघावं. घाबरू नका. त्या भीतीला दूर पळवून लावा आम्ही तुमच्यासोबत आहोत,” असं राहुल गांधी म्हणत आहेत.

मोदी काय म्हणाले?

व्हिडीओत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २८ जानेवारी २०२१ रोजी केलेल्या भाषणाचा संपादित अंश घेण्यात आलेला आहे. ज्यात पंतप्रधान मोदी म्हणत आहेत, “मागील वर्षी फेब्रुवारी, मार्च, एप्रिल महिन्यामध्ये (२०२०) जगातील अनेक तज्ज्ञांनी आणि मोठंमोठ्या संस्थांनी काय काय म्हटलं होतं. करोनामुळे जगात भारताला सर्वाधिक फटका बसेल, असं भाकित केलं गेलं होतं. भारतात करोना संक्रमणाची त्सुनामी येईल, असंही म्हटलं गेलं. पण भारत पुढे जात राहिला. आम्ही कोविडशी संबंधित पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला. आज करोना रुग्णांची संख्या वेगानं कमी होत असलेल्या देशांपैकी एक भारत आहे,” असं मोदी म्हणत आहेत.