काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशातील व्यापमं घोटाळ्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर ‘न खाऊंगा, न खाने दूँगा’ असे छातीठोकपणे सांगण्याऱया मोदींनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना ‘खाऊच’ कसे दिले?, असा खोचक सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला. पंतप्रधानांच्या शब्दाला वजन असते पण तुमच्या नेते मंडळींकडून होणाऱया आक्षेपार्ह व्यक्तव्यांवरून ते दिसत नसल्याची टीका राहुल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून केली आहे. राजस्थानमध्येही तुम्ही नेत्यांना भ्रष्टाचार करू देत आहात. ललित मोदींना भारतात का आणले जात नाही? असे ट्विट करून राहुल यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी सरकारी मालकीचा ढोलपूर महाल लाटल्याच्या प्रकरणाबाबत पंतप्रधानांना विचारणा केली. हे ट्विट म्हणजे पावसाळी अधिवेशनात व्यापमं आणि ललित मोदी प्रकरणावरून सरकार विरोधात राहुल गांधी आक्रमक पावित्र्यात दिसून येतील याचे द्योतक म्हणावे लागेल.