काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि नेते राहुल गांधी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या ‘अॅक्ट ऑफ गॉड’ या वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला. केंद्र सरकारच्या तीन निर्णयांमुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. नोटबंदी, दोषयुक्त जीएसटी प्रक्रिया आणि फसलेलं लॉकडाउन यामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्याचे ते म्हणाले. गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक पार पडली.

आणखी वाचा- तुम्ही ‘मेसेंजर ऑफ गॉड’ आहात, मग उत्तर द्या…; चिदंबरम यांचा सीतारामन यांना सवाल

करोनाची आपत्ती ही ‘अॅक्ट ऑफ गॉड’ असून यंदाही अर्थव्यवस्था आकुंचन पावणार आहे, असं सांगत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना वस्तू व सेवा कराची (जीएसटी) थेट नुकसानभरपाई देण्यास केंद्र हतबल असल्याचे गुरुवारी जणू कबूल केलं होतं. तसंच केंद्रानं राज्यांना पर्यायही दिले होते. त्यानंतर माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी ट्वीटच्या माध्यमातून राज्य सरकारांना आवाहन करत केंद्राकडून देण्यात आलेले पर्यान नाकारण्यास सांगितलं होतं. सुरू आर्थिक वर्षांमध्ये महसूलासाठी राज्यांनी कर्ज घ्यावं आणि त्यात केंद्राकडून मदतही केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं होतं.

आणखी वाचा- २०१५ पासून GDP घसरतोय, ही सुद्धा ‘देवाची करणी’ का?; भाजपा खासदाराकडून सरकारला घरचा आहेर

भरपाईचे दोन कर्जपर्याय

राज्यांना ९७ हजार कोटींचे किंवा संपूर्ण २.३५ लाख कोटींचे कर्ज रिझव्‍‌र्ह बँकेकडून घेता येईल. २०२२ नंतर राज्यांनी ही रक्कम परत करावी, असं सुचवण्यात आलं आहे. कुठल्याही एका पर्यायाची निवड राज्यांना ७ दिवसांमध्ये करावी लागणार आहे. त्यानंतर पुन्हा जीएसटी परिषदेच्या बैठकीत राज्यांच्या जीएसटी नुकसानभरपाईचा प्रश्न चालू आर्थिक वर्षांसाठी निकाली काढण्यात येईल. पुढील आर्थिक वर्षांसाठी एप्रिल २०२१ मध्ये चर्चा केली जाईल, असं सीतारामन यांनी सांगितलं होतं.